
Tejasvee Ghosalkar : 3 वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही अनेक आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी ठाकरे यांची साथ सोडून इतर पक्षांचे पर्याय निवडले. अगदी काल परवाही दत्ता दळवी यांनीही ठाकरे यांना रामराम केला.
यातील काही जण पुढे जाऊन यशस्वी झाले तर काहींचे राजकारण जिथल्या तिथे आहे. पण यातील फार कमी असे लोक होते ज्यांना साथ सोडल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर मातोश्रीवरून बोलावणे आले. समजूत घालण्यासाठी स्वतः ठाकरे यांनी बोलावून घेतले, चर्चा केली, अडचणी समजून घेतल्या ही गोष्ट फार कमी नेत्यांच्या वाट्याला आली.
एका बाजूला भल्या भल्या नेत्यांनी आतापर्यंत साथ सोडली, पण उद्धव ठाकरे यांनी ना त्यांची काळजी केली ना तमा बाळगली. पण काल (13 मे) मंगळवारी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुखपदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला. ठाकरे यांना ही बातमी समजताच त्यांनी घोसाळकर यांना मातोश्रीवर बोलावून घेतले.
काल काही कारणास्तव ही भेट झाली नाही. तर आज (सोमवारी) ही घोसाळकर यांना पुन्हा वेळ मिळाली. त्यानुसार त्या मातोश्री बंगल्यावर गेल्या. तिथे ठाकरे यांची भेट झाली. दोघांमध्ये चर्चा झाली आणि घोसाळकर यांनी ठाकरेंपुढे समस्यांचा पाढाच वाचला. ठाकरेंनीह त्यांच्या अडचणी समजून घेऊन पुढील कारवाईबाबत आश्वासन दिले आहे.
पण ठाकरेंनी समजूत काढलेल्या घोसाळकर नेमक्या आहेत तरी कोण?
फक्त माजी नगरसेविका एवढीच त्यांची ओळख नाही. तेजस्वी या माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तसेच दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.पती अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
लग्नाच्या वाढदिवसाच्या चार दिवस आधीच मॉरिस नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करून गोळ्या झाडल्या होत्या. मात्र त्यातून त्या सावरल्या. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांच्या मतदारसंघात नाराजीची चर्चा होती.
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी माजी महापौर दत्ता दळवी यांनी ठाकरे यांची साथ सोडली. अशात घोसाळकर यांची दहिसर आणि आजूबाजूच्या भागातील ताकद मोठी ताकद आहे. हीच ताकद लक्षात घेऊन ठाकरे यांनी घोसाळकर यांना थांबवण्याचे आणि त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.