
Thackeray brothers BJP comment : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजप महायुतीकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर वारंवार भाष्य केले जात आहे. त्यातल्या त्यात भाजप सर्वाधिक प्रतिक्रिया देत आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची चलबिचल दिसते.
यावरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला ठाण्यात जात महायुतीला टोला लगावला. 'इतर राजकीय पक्षांपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपकडूनच अधिक बोलले जाते', असा टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला.
मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते. ठाण्यातील विष्णूनगर इथं मनसे (MNS) कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून त्यांनी महायुतील जोरदार डिवचलं. निवडणुकीच्या तोंडावर ही युती होत असल्याच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देताना राज ठाकरे याबाबत किती संवेदनशील आहेत, यावर देखील नांदगावकर यांनी भाष्य केलं.
नांदगावकर म्हणाले, ‘महापालिका निवडणूक आली म्हणून आम्ही एकत्र आलो नाही. हिंदीसक्ती राज्य सरकारने आणली. विषय कोणी दिला? तुम्ही दिला, तर मराठी माणूस पेटून उठणारच". उद्धव (Uddhav Thackeray) आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी आता ठरवायचे आहे, की त्यांचे प्रेम टिकवायचे की नाही, असेही नांदगावकर यांनी म्हटले.
‘‘मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे कोणतीही तडजोड करीत नाहीत. त्यांनी हा विषय लावून धरला. हिंदीसक्तीचा विषय आणला नसता तर पुढचे घडले नसते. पालिका निवडणुका हा विषय नव्हता. अजून निवडणुका खूप लांब आहेत. इतर राजकीय पक्षांपेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपकडूनच अधिक बोलले जाते", असे नांदगावकर यांनी म्हटले.
'ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर पक्षाचे प्रवक्ते सोडून इतर लोक बोलतात म्हणून अडचण येते. कार्यकर्ते व्यक्त होत असतात, मग त्याची सावरासावर नेत्यांना करावी लागते. या अनुषंगाने ‘कोणी काही बोलू नये,’ अशी सूचना राज ठाकरे यांनी केली होती’, याची आठवण देखील नांदगावकरांनी कार्यकर्त्यांना करून दिली.
मिरा-भाईंदर येथील घटनेबाबत नांदगावकर म्हणाले, ‘तुम्ही चुका करणार आणि आम्हाला विचारणार? तुम्ही महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलण्यात अडचण काय आहे? ठाणे शहराशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. इथल्या दहीहंडी उत्सवाला मी खूप पूर्वीपासून येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हे येत्या 18 जुलैला मिरा-भाईंदर येथे येणार आहेत. तत्पूर्वी 14 ते 16 जुलैला इगतपुरी इथं मनसेच्या कार्यकर्त्यांचे शिबिर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.