Mumbai : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. आम्हांला कोणाला फसवायचं नाही. आमची भूमिका देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हाही होती आणि आजही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह त्यांच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारचं युध्दपातळीवर काम सुरु आहे. तसेच ज्या काही त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणात काढल्या आहेत, त्यावर काम सुरु आहे. आरक्षणात सरकार कधीच मागे पडणार नाही.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनेच सरकार आहे. पण आरक्षणाचा मुद्दा कायदेशीरदृष्ट्या निकाली काढण्यासाठी काही अवधी लागणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसह मराठा समाजाला दिला. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या आडून काही लोकं आपली पोळी भाजून घेत समाजात शांतता बिघडवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप विरोधकांवर केला आहे.
जालन्यात मराठा समाजातील आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. याविरोधात प्रचंड संतापाचा लाट पसरली आहे. अशातच राज्य सरकारकडून सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही मराठा आरक्षणाबाबत त्रुटी काढल्या आहेत. त्यावर आम्ही काम करतोय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे बाजूनेच सरकार आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवावा. आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. (Manoj Jarange Maratha Andolan) याचवेळी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे काही सवलती दिल्या जात आहेत, त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेआधी मराठा आरक्षणा(Maratha Reservation) च्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde )च्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्याचे विविध महाधिवक्ता, छत्रपती उदयनराजे भोसले, काही काळाकरता संभाजीराजेही उपस्थित होते. विविध अधिकारी होते. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली परिस्थिती आहे त्यावर चर्चा झाली.
शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात एक उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. जालना येथील आंदोलन, उपोषण, लाठीहल्ला हा दुर्देवी प्रकार, तसेच मनोज जरांगेशी देखील मी स्वत: बोललो होतो. उपोषण आणि आपले जे काही आंदोलन, मागण्यांवर मी काम करतोय, मंत्री, गिरीश महाजन, अतुल सावे, संदिपान भुमरे, य़ांना मी पाठवलं. याआधीही मराठा समाजाचे आंदोलने झाली ती आपण पाहिली. लाखा लाखांचे मराठा समाजाचे ५८ मोर्चे या महाराष्ट्रात निघाले, पण अतिशय शिस्तप्रिय पध्दतीने निघाले. कधीही त्याला गालबोट लागले नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली. (Maratha Morcha Lathicharge)
परंतू, दुर्देवाने दोन तीन दिवसांपासून जे काही सुरू आहे. मी कालही माझ्या भाषणात सांगितले, मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे. याचा अनुभव काही वर्षांत आला. पण आंदोलनाच्या आडून काही लोकं शांतता बिघडवण्याचे काम, जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करत असून त्यांच्यापासून सावध राहण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मराठा समाजाला केले.
शासन संवेदनशील....
खासदार उदयनराजे, संभाजीराजेही त्या ठिकाणी गेले त्यांनी तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) मी मनापासून धन्यवाद देतो, ते स्वत : त्या ठिकाणी गेले.त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली. काही लोकं त्या ठिकाणी गेले, त्यांनी सोबत असल्याचे सांगितले. पण मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी सरकारला नक्कीच आहे. तब्येत खालावल्यानंतर तिथे अधिकारी गेले, त्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जो काही लाठीचार्जचा प्रकार घडला त्याची आम्हांला खंत आहे. शासन आपलं संवेदनशील आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
'' दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल...''
मी आजही जरांगेशी बोललो. त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हांला आहे. त्यांच्या मागण्यांवर आम्ही गांभीर्याने काम करत आहोत. त्यावेळेस सरकार जर गंभीर नसतं. तर फडणवीस मुख्यमंत्री असताना दिवस रात्र काम करून मराठा समाजाला आरक्षण दिलं नसतं. तसेच तिथे जो लाठीचार्जचा प्रकार घडला, त्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यात एसपीची जिल्ह्याबाहेर बदली केली असून उपविभागीय अधिकारी निलंबित केले. आता अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना चौकशी करतील. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्री शिंदेंनी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.