मुंबई : गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. लता दीदींना (Lata Mangeshkar) कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसून येत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (Lata Mangeshkar Passes Away)
लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या पेडर रोड येथील 'प्रभुकुंज' या निवासस्थानी आणण्यात आले. आज सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी दुपारी 12.30 ते 3 पर्यंत प्रभूकुंज येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. लतादीदींच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ते मुंबईत दाखल होतील.
लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, केंद्र सरकारने लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच, राष्ट्रध्वज तिरंगाही अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनासाठी जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.
लतादीदींना श्रद्धांजली
-रश्मी ठाकरे
लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार प्रतिभा धानोरकर (भद्रावती - वरोरा मतदार संघ)
संगीत व गायन क्षेत्रातील 'गानकोकिळा' लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील. लतादीदींच्या आवाजाचे स्वर आसमंतात कायम गुंजत राहतील. लतादीदींची जागा भविष्यात कोणी घेऊ शकणार नाही. इतका ठेवा त्यांनी देशाला दिलेला आहे.
खासदार बाळू धानोरकर, (चंद्रपूर- आर्णी- वणी लोकसभा क्षेत्र)
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही... अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही...”
पशूपालन मंत्री सुनील केदार
संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.