Mumbai : काही दिवसांपूर्वी मुंबईत हिंदू जन आक्रोश रॅली काढण्यात आली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले.
मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले, ''महाराष्ट्र सरकार काहीही करत नाही. ते शांत आहे, त्यामुळे सर्व काही घडत आहे. मात्र, राजकारण आणि धर्म हे वेगवेगळे ठेवण्याची गरज आहे. तसं झालं तरच कटुता संपुष्टात येईल''.
''राजकारण्यांनी धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी करणं आता बंद केलं पाहिजे. तरच धार्मिक मुद्द्यांवरून असलेले सर्व वाद थांबतील. आम्ही केवळ सांगू शकतो. ऐकायचं की नाही ते तुम्हीच ठरवणार आहात'', अशा कठोर शब्दात महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं आहे.
यावेळी सरकारच्यावतीने बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही न्यायालयाने सुनावलं आहे. ''तुम्ही नाटक बंद करा. धार्मिक वक्तव्यासंदर्भात तुम्ही काय करत आहात हे सांगा. तेढ निर्माण करणारी भाषा एक दुष्टचक्र आहे. यावर लोक प्रतिक्रिया देणारच. हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे'', असं मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केलं.
मुस्लीम समाजाविरोधात आपत्तीजनक विधानाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर सकल हिंदू समाजाच्यावतीने त्यांच्या संघटनेला धार्मिक यात्रा/मोर्चा काढण्याचा अधिकार असल्याचा युक्तीवाद केला. यावर न्यायालयाने पुन्हा एकदा कठोर शब्दात ताशेरे ओढले.
''तुम्हाला कायदा धार्मिक मोर्चा काढण्यास परवानगी देतो. पण हाच धार्मिक मोर्चा देशाचा कायदा तोडण्याची परवानगी देत नाही. या मोर्चामधून अल्पसंख्याक समुदायाला खाली पाहावं लागेल, अशी वक्तव्य केली जात आहे. त्यांना पाकिस्तानला जाण्यास सांगितलं जात आहे''.
''मात्र, हे ते लोक आहे ज्यांनी भारताला आपला देश मानलं. ते तुमचे भाऊ-बहीण आहेत. भाषणाचा स्तर खाली जाता कामा नये. विविधतेला स्वीकारणारी आपली संस्कृती आहे'', असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
दरम्यान, न्यायमुर्ती नागरत्ना यांनी या सर्व विधानांवर चिंता व्यक्त केली. आपण कोणत्या दिशेने जात आहोत? असा सवाल उपस्थित केला. न्यायमूर्ती नगररत्न म्हणाले, ''आपल्याकडे जवाहरलाल नेहरू, वाजपेयी यांच्यासारखे नेते आपल्याकडे झाले. जवाहरलाल नेहरू यांचे ते मध्यरात्रीचे भाषण बघा. मात्र, आता सगळीकडून अशी आक्षेपार्ह विधाने येत आहेत हे चिंताजनक आहे, असं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.