Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपले बळ दाखवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत.
यातूनच सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे शिवीगाळ केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले. त्यांचे निलंबन हे सत्ताधाऱ्यांचे षडयंत्र असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
ठाकरे म्हणाले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Ambadas Danve यांचे निलंबन केले आहे. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणे आवश्यक असते. लोकशाहीत दुसरी बाजू मांडू ऐकणे गरजेची असते. त्यानंतर निर्णय अपेक्षित असतो. आता निलंबन करणे किंवा न करणे हा सर्वस्वी निर्णय सभापतींचा असतो. मात्र दानवेंचे निलंबन हे सत्ताधाऱ्यांच्या षडयंत्राचा एक भाग होता, असा घणाघात ठाकरेंनी केला.
एका कुणाकडून तरी मागणी झाली आणि त्यावर निर्णय घेणे हे लोकशाहीसाठी मारक आहे. हा एकतर्फी निर्णय घेतला गेला. अंबादास दानवे किंवा आमच्या कुणालाही बाजू मांडू दिली नाही. यामुळे हे जणू काही ठरवूनच षडयंत्र रचूनच निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यास निलंबित करण्याचा प्रकार इतिहास पहिल्यांदाच घडला आहे, याकडेही ठाकरेंनी लक्ष वेधले.
लोकसभेत, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात आम्हाला चांगले यश मिळाले आहे. हा विजय झाकोळून टाकण्यासाठी हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यांनी सादर केलेल्या बोगस अर्थसंकल्पाचीही आता चिरफाड होत आहे. जनतेच्या लक्षात आलेले आहे की निवडणुकीच्या तोंडावर सरकारने दिलेले हे गाजर आहे. या चर्चांवरून लक्ष हटवण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची शंका आहे. मूळ मुद्दा बाजूला पडावा, त्यातूनच आकसाने हा विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले आहे, असा टोलाही ठाकरेंनी Uddhav Thackeray लगावला.
विधान परिषदेत आणण्यात येणारा राहुल गांधींच्या निषेधाचा ठरावच चुकीचा होता. त्याकडेच दानवेंनी लक्ष वेधले होते. राहुल गांधी भाजप म्हणजे हिंदुत्व बोलले आहेत, ते काहीही चुकीचे नाही. त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेला नाही. सत्ताधारी अपुऱ्या माहितीच्या जोरावर विधान परिषदेत ठराव आणू पाहत होते. असत्य माहितीच्या आधारे सत्ताधारी ठराव मांडून सभागृहाचा अपमान होणार होता. त्यालाच दानवेंनी विरोध केला होता, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना पाठिंबाही दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.