Maharashtra Navnirman Sena News : शिवसेनेच्या 58व्या वर्धापनद दिनानिमित्त ठाकरे गटाने मुंबई षणमुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. याप्रसंगी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणातून अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदी, भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.
तसेच, लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने यावरून राज ठाकरेंचा नामोल्लेख न करता त्यांना टोलाही लगावला. ज्यावर आता मनसेकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
'हिरव्या मतांमुळे काही जागा जिंकणाऱ्यांना पाणचट जोक मारायची जुनी सवय आहे ! येणाऱ्या विधानसभेत मराठी माणूस यांचे कपडे साबूत ठेवणार नाही एवढं नक्की!' असा मनसेने उद्धव ठाकरेंव पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(Maharashtra Navnirman Sena) नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, 'हिरव्या मतांनी थोडाबहुत विजय संपादित केलेल्या लोकांना पाणचट जोक मारायची सवय झालेली आहे. ती अजून गेलेली नाही, याच्या आधी करोनामध्ये पानचट जोक मारायचे आता पानचट जोक मारायला सुरुवात केलेली आहे पण एक नक्कीच सांगतो, येणाऱ्या विधानसभेत या पाणचट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत. मराठी माणसांनी त्यांना यावेळी मतदान केलेलं नाही.'
तसेच 'जे काही मतदान झालं ते हिरवं मतदान झालं, जो काही विजय झाला तो हिरवा विजय झाला. त्यामुळे असे पाणचट जोक सूचत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला वाटतं मराठी माणूस यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यांचे कपडे शाबूत ठेवणार नाही एवढं नक्की.' असं संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) म्हणाले.
याशिवाय, 'उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) विरोधाचा काय संबंध आला? तुम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही सोडलेलं नाही, आम्ही हिंदुत्वाच्या बाजूने होतो. देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे कदाचित हे विसरले असतील, ज्यावेळी ठाण्यात त्यांची सत्ता बसायची होती, त्यावेळी त्यांनाही आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे.
पण दुसऱ्यांचे नगरसेवक चोरणाऱ्यांना याची काय जाण असणार. याचं काय महत्त्व असणार आहे, सतत आयुष्यात चोरीच केली आहे. याचे त्याचे नगरसेवक फोड, याला पैशांचं अमीष दाखव आणि स्वत:वर वेळ आली की रडत बसायचं. हे त्यांचे धंदे आहेत.' अशा शब्दांमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार पलटवार केला.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्यांची जोरदार खिल्ली उडवली. बिनशर्त पाठिंब्यांचा उल्लेख 'बिनशर्ट', असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी करताच सभागृहात एकच हशा झाला. शिट्या वाजल्या. या निवडणुकीमुळे आपले कोण? आणि परके कोण?, मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे उघड झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
"काही जणांना उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला. बिनशर्ट... अरे, उघड पाठिंबा म्हणजे! बिनशर्ट... म्हणजे उघड पाठिंबा. म्हणजे 'बिनशर्ट' ना! बरोबर की चूक? काय, नको नको उद्धव ठाकरे नको. बघा, मी हा शर्ट काढला. 'बिनशर्ट' पाठिंबा देतो तुम्हाला. म्हणजेच उघड!", असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) बिनशर्तची खिल्ली उडवली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.