MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वाची बैठक आज मुंबईत होत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही बैठक बोलाविली असून यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने कशा पद्धतीने सामोरे जायचे यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीत मनसे महायुतीकडे मुंबई आणि परिसरातून 20 जागांची मागणी करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. रंगशारदा येथे ही बैठक होणार असून यासाठी विविध शहरातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी मुंबईत दाखल झाले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने महायुतीला आपला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते. केंद्रात गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम महत्वाचे आहे.
मोदी यांनी अत्यंत ठामपणे निर्णय घेत काम केले आहे. यापुढील काळातही मोदी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज असल्याचे स्पष्ट करत केवळ त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत मनसे त्यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचे काम केले.
मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठींबा हा केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच असेल असे स्पष्ट शब्दात सांगत विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे संकेत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
राज्यात महायुतीची सत्ता असल्याने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्रितपणे निवडणूक लढविणार आहेत. त्यातच मनसेने महायुतीत सहभागी व्हायचे ठरविल्यास जागांचे वाटप कसे असावे, याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी बैठक होणार आहे.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांची क्रेझ चांगली आहे. मात्र त्यातुलनेत मनसेचे उमेदवार विधानसभेमध्ये निवडून येत नाही. आता लोकसभेसाठी मनसेने महायुतीला पाठींबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे विशेष कौतुक देखील केले होते.
लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठींबा देत एकही जागा लढविली नसली तरी विधानसभेच्या निवडणुकीत जागा लढविण्याचा निर्धार मनसेने केला आहे. आज होणाऱ्या बैठकीत मनसे महायुतीकडे मुंबई आणि परिसरातील 20 जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राज्यातील कोणत्या शहरामध्ये मनसेने किती जागा मागायच्या यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची कार्यकारिणी निवडणूक देखील गुरूवारी पार पडत आहे. चार दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्वाच्या नेत्यांची बैठक देखील घेतली होती. त्यावेळी देखील उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली होती.
मुंबईसह पुणे, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील किती जागांवर मनसे निवडणूक लढवू शकते यावर चर्चा होणार आहे. महायुतीने जागा न दिल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढायची झाल्यास पक्षाची ताकद कुठे आणि किती आहे,यावर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.