Meera-Bhyandar News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मीरा भाईंदर येथे यादव सेवा संस्थेने आयोजित केलेल्या गोवर्धन पूजा कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. शिवाय, रामल्ला तुमची मालमत्ता आहे का? असा सवालही केला.
उद्धव ठाकरे( Uddhav Thackeray) म्हणाले, ''आजकालच्या जगात आपलं माननं आणि आपलं मानायाचं तर कुणाला मानावं हे फार कठीण झालं आहे. हे तर राजकारण आहे, कालपर्यंत जो आपल्या घरात होता, ज्याला आपलं समजलं तोच आज शत्रू होऊन समोर उभा आहे.
अशावेळी भगवान श्री कृष्णाची आठवण होते, ज्यांनी अर्जुनाला गीता समजावून सांगितली होती. कारण, समोर तर सगळे आपलेच होते त्यामुळे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला होता की मी कसा धनुष्य बाण उचलू? इथंतर तर आपला धनुष्य बाणही त्यांनी चोरला आहे.''
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय, ''परंतु महाभारतात भगवान श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे उपदेश केला आहे, की धर्माच्याविरोधात कोणीही उभा राहिला तरी त्याचं निर्दालन करावंच लागेल. महाभारत तर फार पूर्वी घडलं, परंतु आज भारताची जनताच भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे. मी जनतेमध्येच श्रीकृष्णाचं रूप पाहतो आहे.'' असंही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.
तसेच ''उत्तरभारतीय आणि मराठी माणूस दूध आणि साखरेप्रमाणे एकमेकांमध्ये मिसळले आहेत. तर आता आपल्याला लक्ष द्यावे लागेल की या दूध आणि साखरेत मीठ कोण टाकतं आहे. आपल्या एकजुटीत मीठ कोण मिसळत आहे. '' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
याचबरोबर ''राम मंदिराची निर्मिती होत आहे, ही अतिशय गर्वाची आणि आनंदाची बाब आहे. मात्र राम मंदिर निर्माण होत असताना मला तेही दिवस आठवत आहेत, जेव्हा 1992-93च्या काळात शिवसेनेने मुंबईतील हिंदूंना वाचवलं होतं. आज तर भव्य मंदिर निर्माण होत आहे, परंतु तो काळ असा होता की मी हिंदू आहे असं म्हणायलाही लोक घाबरत होते.'' असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच ''भाजपचा(BJP) तर प्रश्नच नव्हता, जेव्हा इथं मुंबई जळत होती तेव्हा एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक, तेव्हा हाती सत्ताही नव्हती आणि काहीच नव्हतं तरी जे देशद्रोही आपल्याविरोधात चालून आले होते, म्हणजेच धर्माच्याविरोधात अधर्म तेव्हा धर्माचे रक्षण करणारी शिवसेना होती.'' असं यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं.
तर ''आमचं हिंदुत्व केवळ दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं नाही. माझे वडील सांगायचे की हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय कार्य. या देशाला आपलं मानणारे प्रत्येकजण आपलाच आहे. देशासाठी बलिदान देणारा प्रत्येकजण आपला आहे.'' असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय ''आम्ही भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्रास मानतो, सर्वांनाच मानतो. महिनाभरापूर्वी विधानसभा मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ठिकाणी निवडणुका झाल्या. जो काही निकाल आला तो सर्वांसमोर आहे. परंतु विशेष करून मध्य प्रदेशात आपल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं, की जर तुम्ही आम्हाला मत द्याल तर आम्ही रामलल्लाचं मोफत दर्शन तुम्हाला घडवू. रामलल्ला तुमची मालमत्ता आहे का?'' असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
''वर्षानुवर्षे जय श्रीकृष्ण, जय श्रीराम सुरू आहे आणि तुम्ही तर आता आता आला आहात. तुम्हीला वाटतं जय श्रीराम किंवा जय बजरंगबली म्हटलं तर सर्व हिंदू आपल्यासोबत येतील. हाच फरक आहे त्यांचं हिंदुत्व आणि आमच्या शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे.
रामलल्लाचं दर्शन मोफत करा, पण जर तुम्ही मध्यप्रदेशात करत असाल तर मग महाराष्ट्रातील हिंदूंचं काय? त्यांनी कोणता गुन्हा केला. त्यांना का तुम्ही रामलल्लाचं मोफत दर्शन घडवत नाही? रामलल्ला तर संपूर्ण विश्वाचे आहेत. असं हिंदुत्व तुम्हाला हवं आहे का ?'' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.