Narayan Rane News : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरुच आहे. आता नारायण राणे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.
''संजय राऊत हे राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबाबत सांगायचे. जर हे ऐकलं तर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चपलीने मारतील'', असं राणे म्हणाले आहेत. नारायण राणे हे आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, ''एक ना एक दिवस उद्धव ठाकरे यांना मी भेटणार आहे. याच कारण म्हणजे मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत हे माझ्या बाजूला बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबाबत मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे'', असा आरोप त्यांनी केला आहे.
''त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) हे मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांच्याबाबत जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली ही माहिती उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना सांगितल्यानंतर संजय राऊतांना चपलाने मारले नाही, तर मला विचारा'', असं नारायण राणे म्हणाले आहेत.
''संजय राऊतांनी शिवसेना (Shiv Sena) वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. संजय राऊत हा व्यक्ती म्हणजे मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. राऊत ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळतोच, असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याबाबत मला पुन्हा काही विचारू नका'', असंही राणे यावेळी म्हणाले आहेत.
...तर आव्हान स्वीकारायला तयार : राणे
तुम्ही धमक्या देणार असाल तर फक्त राजवस्त्र बाजूला काढा आणि मग या, असं आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिलं होतं. तर आता नारायण राणे यांनी हे आव्हान स्वीकारायला आपण तयार असल्याचे सांगितले आहे.
याबाबत बोलताना राणे म्हणाले, ''मी मला कधीही सुरक्षा मागितली नाही. मला आत्ता नाही तर 1990 पासून सुरक्षा आहे. तेव्हा तर तो शिवसेनेत नव्हता. तेव्हा तो शिवसेनेविरुद्ध लोकप्रभामध्ये लेख लिहायचा. मात्र आता सांगतो, संजय राऊत जिथे बोलावशील तिथे मी सर्व सुरक्षा सोडून यायला तयार आहे'', असं म्हणत राऊतांचे आव्हान स्वीकारायला तयार असल्याचं राणेंनी सांगितले आहे. दरम्यान, यावर आता संजय राऊत हे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.