
Public Security Bill Maharashtra : जनसुरक्षा विधेयकावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्यातील एकमेव आमदार भाजप महायुती सरकारला भिडला आहे. आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत विधेयकाला विरोध दर्शविला आहे.
'जनसुरक्षा विधेयक हे कामगार, कष्टकरी व आंदोलन करणाऱ्या घटकांचे हक्क हिरावून घेणारा आहे', असा आरोप आमदार निकोले यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले असताना, दोन्ही सभागृहांत सत्ताधारी पक्षाला बहुमत असल्यामुळे ते सहज मंजूर होणार असल्याचे स्पष्ट होते. तरीही या विधेयकातील गंभीर त्रुटी लक्षात आणून देत विरोधकांनी ठामपणे विरोध करणे आवश्यक होते, असे आमदार निकोले यांनी म्हटले.
'नक्षलवाद (Naxal) संपवणे महत्त्वाचेच आहे; मात्र यासाठी आधीच 'मकोका'सह अनेक कायदे अस्तित्वात आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे, अशा परिस्थितीत नव्या विधेयकाची गरज काय?', असा सवाल आमदार निकोले यांनी उपस्थित केला.
'कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही आवाज उठवत असतो. त्यामुळे आम्हाला संविधानविरोधी ठरविण्याचा प्रयत्न हा चुकीचा आणि लोकशाहीला घातक आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे असंवैधानिक असून, भविष्यात याचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे कामगारांच्या संघटनांच्या हक्कांवर गदा येईल आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे', असेही आमदार निकोले यांनी म्हटले.
'भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा संविधानाला व कायद्याला मानणारा पक्ष आहे. आम्ही विविध प्रश्नांसाठी आंदोलने करतो. मात्र ती नेहमी कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जातात. कामगार, शेतकरी, कष्टकरी आणि विविध संघटना ह्या सगळ्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. अशा संघटनांवर सरकारने कारवाई करू नये आणि त्यांचे हक्क हिरावून घेऊ नयेत', असेही आमदार निकोले यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.