Mumbai News : छत्रपती शिवाजीमहाराजांची वाघनखे (Waghnakhe) राष्ट्रात आणली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. याला निमित्त ठरलंय ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं ट्विट. कारण लंडनमधून वाघनखं नोव्हेंबर 2023 मध्ये आणण्याचा वादा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यामुळे आता 'क्या हुआ तेरा वादा?', असा सवाल विरोधक महायुती सरकारला विचारत आहेत.
शिवरायांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखे भारतात आणता यावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने म्युझियमशी करार केला आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आणणार, अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यानंतर नोव्हेंबरऐवजी जानेवारी 2024 चा मुहूर्त सांगण्यात आला. तरीही काहीही हालचाल न झाल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खोचक ट्विट करून सुधीर मुनगंटीवार यांना सवाल केला आहे.
नोव्हेंबर गेले, जानेवारी हुकले, सुधीरभाऊ वाघनखं कुठंपर्यंत पोहोचली? असा सवाल वडेट्टीवार यांना केला आहे. एवढंच नाही तर तुम्ही लंडनला जाऊन रिकाम्या हातानं परत आलात, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी केली होती. आता पुन्हा लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार? असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
शिवछत्रपतींनी अफझलखानाचा वाघनखांनी वध केला होता. कालांतरानं शिवकालीन वाघनखं ब्रिटनमध्ये गेली आणि त्यांनी तो ऐतिहासिक ठेवा लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवला. वाघनखं हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असून मराठीजनांची अस्मिता आहे. त्यामुळे ती आणण्याचा मानाचा महाराष्ट्राचा विडा महायुती सरकारने उचलला. त्यादृष्टीनं पाऊलही टाकलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पण ती वाघनखं कायमस्वरुपी नव्हे, तर तीन वर्षांसाठी आणली जात असल्याचं कळताच सरकारवर टीकेची झोड उठली होती. शिवाय ही वाघनखं शिवाजीमहाराजांनी वापरलेली नाहीत, तर शिवकालीन आहेत, असेही आरोप झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला वाघनखं मिळण्याची प्रतीक्षा होती.
पण, आता ही वाघनखं एप्रिल-मेमध्ये महाराष्ट्रात येतील, अशी माहिती मिळते. म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघनखांचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेला येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर वाघनखं आणणं हे राजकारण असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विरोधकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सरकारवर टीका सुरू केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.