
Mumbai, 17 December : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्यासोबत आज झालेली भेटी ही सदिच्छा भेट होती. एखाद्या पक्षासंदर्भात असलेली भूमिका आणि टीका विसरून राज्याच्या प्रमुखांना भेटणं, हे सकारात्मक राजकारण आगामी काळात पुढच्या दिशेन जाऊ शकतं. ते जात असेल तर त्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे, असे सूचक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज नागपूर येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटीवेळी उपस्थित असलेले आमदार अहिर यांनी या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याची इत्यंभूत माहिती दिली.
आमदार अहिर म्हणाले, मागील अधिवेशनातही आम्ही सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. तीही सदिच्छा भेट होती आणि आजचीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबतची सदिच्छा भेटच होती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही निवडणुकीत कितीही विरोध केला तरी निकालानंतर विरोधाला विरोध न करण्याची भूमिका घेतली जाते. योग्य की अयोग्य आहे, यापेक्षा त्या पदाचा मान असतो. त्या पदाचा मान ठेवण्याच्या दृष्टीकोनातून ही भेट झाली आहे.
उद्धव ठाकरे हे आज योगायोगाने नागपूरला आले होते. ही भेट काही नियोजित नव्हती, तर इनस्टंट अशी होती. ठाकरे यांनी ‘आपण मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे’, अशी भूमिका सर्व आमदारांसमोर मांडली. त्यानंतर ‘चला जाऊया भेटायला,’ असं म्हणून ती भेट झाली आहे. त्यामुळे ही भेट काही ठरवून, प्लॅनिंग करून किंवा या विषयासाठी आपण जाऊया. कोणाला घेऊन जाऊया, असं ठरवून झालेलं नाही. अगदी मोजक्या आमदारांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला गेलो होतो. सर्वच आमदारांना निमंत्रण अथवा आमंत्रण नव्हतं. ती एक सदिच्छा भेट होती, असेही अहिर म्हणाले.
सचिन अहिर म्हणाले, सरकारचं अभिनंदन करण्यात आलं. या भेटीत अनौपचारिक चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रहिताचं काम तुमच्याकडून झालं पाहिजे आणि ते झालं नाही तर विरोधी पक्ष या नात्याने आमची भूमिका मांडत राहू, असेही या भेटीत सांगण्यात आलं.
शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच राहिलेला आहे. ज्या ज्यावेळी असा प्रसंग आला, त्या त्या वेळी आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विषय तसे आलेले आहेत.आता समजा हनुमान मंदिराचा प्रश्न आला नसता तर आम्हाला तो विषय उचलायची गरज लागली नसती. जाणूनबुजून विषय तयार करून ते विषय उचलण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरणही अहिर यांनी दिले.
अहिर म्हणाले, सावरकरांचा विषय काँग्रेस आणि भाजपने बाजूला ठेवावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यापलिकडे जाऊन आपण देशाचे आणि राज्याचे राजकारण केले पाहिजे, असा विचार ठाकरेंनी यापूर्वीही मांडलेला आहे. शेतकरी, बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.
नाना पटोलेंकडे दुर्लक्ष नाही
नाना पटोलेंकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केले का, यावर सचिन अहिर म्हणाले उद्वव ठाकरे यांनी नाना पटोले यांना बघितलं असतं तर हाक मारली असती. ते आमचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. आमच्या अगोदरच्या मित्रांनी मित्रत्व निभावलं नाही. पण या लोकांनी मला साथ दिली आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी अनेकदा मांडली आहे, असा दावाही अहिर यांनी केला.
अध्यक्षांकडे चांगली कॉफी मिळाली
विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. अध्यक्षांचीही सदिच्छा भेट होती. पण अध्यक्षांकडे चांगली कॉफी मिळाली. त्याची चर्चा झाली. अशा गाठीभेटी व्हायला पाहिजेत. राजकीय प्रथा परंपरेचे जतन केलं पाहिजे, अशी भूमिकाही अहिर यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.