Shirdi News, 27 Sep : एका अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात गोंधळ घालत नासधूस केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांनी या घटनेवरून फडणवीसांवरच निशाणा साधला आहे.
तर मंत्रालयात सुरक्षाव्यवस्था असतानाही ती महिला उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचलीच कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशातच आता या सर्व घटनेवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कार्यालयात नासधूस झाल्याची घटना काल घडली आहे. नासधूस करणाऱ्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने असं का केलं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कशाच्या उद्विग्नतेने तीने हे केले तिने हे कृत्य केले का? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल."
तर तोडफोडीच्या प्रकरणावरून लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला असल्याची टीका विरोधक करत आहे. या संदर्भात फडणीवासांना (Devendra Fadnavis) प्रश्न विचारला असता ते म्हणाले, विरोधक इतके हताश झाले आहेत की, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. मला जर टीका करायची असेल तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो.
पण कोणी खालच्या स्तरावर उतरले म्हणून माझ्या सारख्यांनी खालच्या स्तरावर थोडी उतरायचं असतं? एखादी बहीण चिडली असेल तर तिची व्यथा आपण समजून घेऊ. परंतु कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तरीही त्या महिलेची बाजू समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर (Ladaki Bahin Yojana) टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला त्यांची टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटते. राजकारणात एकाने विकासाची रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, रोज न्यायालयात जाऊन ही योजना कशी बंद करता येईल याचे प्रयत्न करणे, आम्ही निवडून आलो तर योजना थांबवू, या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या पाहिजेत", असं ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विट करत या घटनेवरून सरकार आणि फडणवीसांना टोला लगावला आहे. "मंत्रालयातील 6 व्या माळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करतांना व्हिडीओत दिसत आहे. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे. राज्यातील ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत", असं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.