Mumbai Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेश कार्यक्रमापूर्वीच सिद्दिकींचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी स्वपक्ष काँग्रेसवर सडकून टीका केली. या वेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीतील नेत्यांचाही समाचार घेतला. कोरोनासह इतर अडचणीच्या काळात पक्षाने मदत केली नसल्याचा गंभीर आरोप केले. झिशान यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) बाहेर पडल्यानंतर झिशानही काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले, मी सध्या तरी काँग्रेसमध्ये आहे. भविष्यातील राजकीय स्थिती काय असेल, याबाबत आताच काही सांगता येत नाही. मात्र, सरकार असतानाही महाविकास आघाडीत माझ्यावर झालेला अन्याय जगजाहीर आहे. तरुण आमदार असल्याने मदतीची अपेक्षा होती, मात्र कुणीही अडचणीत मदत केली नाही. मला खटकणाऱ्या गोष्टींबाबत वारंवार जाहीरपणे बोललो, मात्र त्याचीही कुणी दखल घेतली नाही, असा आरोप झिशान यांनी केला.
मित्र पक्षांची मदत करण्याच्या नादात काँग्रेसने स्वतःचे नुकसान केल्याची टीकाही झिशान सिद्दिकी यांनी केली. माझ्या मतदारसंघात निधीची गरज होती. त्यासाठी वारंवार मागणी करत होतो, मात्र निधी मला न मिळता शेजारील ठाकरे गटाच्या आमदारांना निधी मिळाला, याकडे झिशान यांनी लक्ष वेधले. एकदा अडचणीच्या काळात मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंना वारंवार फोन केले, मात्र फार बिझी असल्याने त्यांनी फोन उचलले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचे प्रमुख नेते माहिती नसल्याचे सांगत झिशान (Zeeshan Siddique) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले. महाविकास आघाडीची सत्ता असतानाही मला निधी मिळत नव्हता. तो आता विरोधात असतानाही मिळत आहे. विरोधात असतानाही राज्याचे उपमुख्यमंत्री पवार माझ्या कार्यालयात आले. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. यापूर्वी आमच्या सरकारमधील मुख्यमंत्री काही मीटरवर येऊनही मला निमंत्रण मिळत नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार झिशान सिद्दिकी यांनी मित्र पक्षांतील नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनाही त्यांनी टोले लगावले आहेत. सध्या मी काँग्रेसमध्ये असून पक्षाची ध्येयधोरणे राबवणार असल्याचेही शेवटी झिशान यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वपक्ष काँग्रेस आणि मित्र पक्षांना झिशान यांनी खडेबोल सुनावले आहेत. या पक्षविरोधी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.