सांगा भाऊ तुमच्याकडून कितीची पावती फाडू?... बिघडले भावी आमदारांचे बजेट

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भावी आमदारांना त्यांचे बजेट थोडे वाढवावेच लागेल असे दिसत आहे. कारणही तसेच आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक गणेशोत्सव, मस्कऱ्या गणपती त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव व लगेच येणारा दसरा. या उत्सवांमुळे भावी उमेदवारांचे गणित पुरते कोलमडले आहे.
सांगा भाऊ तुमच्याकडून कितीची पावती फाडू?... बिघडले भावी आमदारांचे बजेट
Published on
Updated on

नागपूर : गेल्या वेळेस तुम्ही कमी दिले होते, पण यंदा नाही चालणार....यावेळी प्रचार करायचा आहे न तुमचा...बस काय एवढेच? थोडे वाढवून टाका....भाऊ तुमच्याकडून कितीची पावती फाडू?...या प्रश्‍नांनी विद्यमान आणि भावी आमदार पुरते हैराण झाले आहेत. मतदारसंघातल्या विविध सार्वजनिक उत्सव समितीच्या लोकांना देणगी देता-देता नाकीनऊ आल्याचे अनेकांनी सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकांना नाराज कसे करणार? म्हणून त्यांना समाधानकारक आकड्याची देणगी द्यावीच लागत आहे. यामुळे भावी आमदाराचे इलेक्‍शन बजेट आतापासून कोलमडले आहे.

निवडणूक म्हटले की प्रत्येक उमेदवार येणाऱ्या खर्चाचे नियोजन करून तयार राहतो. खरे तर निवडणुकीच्या वर्षभर आधीपासूनच भावी उमेदवाराची त्याच्या संभाव्य मतदारसंघात तयारी सुरू असते. त्यासाठी ठिकठिकाणी पोस्टरबाजी, आरोग्य शिबिर किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आदींची शृंखलाच सुरू असते. यासाठी थोडा-थोडा खर्च सुरू असतो.

मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भावी आमदारांना त्यांचे बजेट थोडे वाढवावेच लागेल असे दिसत आहे. कारणही तसेच आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक गणेशोत्सव, मस्कऱ्या गणपती त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव व लगेच येणारा दसरा. या उत्सवांमुळे भावी उमेदवारांचे गणित पुरते कोलमडले आहे. अगदी सकाळपासून मंडळांचे पदाधिकारी देणगीसाठी गर्दी करीत आहेत. एवढेच नाही तर 'भाऊ' घरी सापडले नाही तर कुठे ना कुठे त्यांना गाठून (वेळप्रसंगी जबरदस्तीने) पावती फाडून घेतात.

नाराज कसे करणार?
परिसरात अनेक लहान-मोठे मंडळे आहेत. प्रत्येकजण अधिकाधिक देणगी मागण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकी जवळपास सर्वांना खुश करावे लागते. त्यांना नाराज करणे निवडणुकीसाठी काही परवडण्यासारखे नसल्याचे काही आमदार व निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी सांगितले.

महागाईमुळे खर्च वाढला
सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी येणारा खर्च आवाक्‍याबाहेर गेला आहे. परिसरातील नागरिक खुल्या दिलाने देणगी देत नाही. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींकडून अधिक अपेक्षा असते. यंदा तर निवडणूक तोंडावर असल्याने सर्वच राजकीय नेतेमंडळी चांगला प्रतिसाद देत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com