Satara News: महाराष्ट्रात महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच लढाई आगामी निवडणुकांमध्ये होणार आहे. महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित येत प्रत्येक जिल्ह्यात मेळावे आयोजित केले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडी लोकसभा ताकदीने लढणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप एकही बैठक किंवा मेळावा झाला नसल्याने राज्य पातळीवर एकवटलेली महाविकास आघाडी ग्राऊंडवर सैरभैर असून ती कधी एकवटणार? असा सवाल पदाधिकारी करू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीने अजूनही एकत्रितपणे भूमिका मांडलेली नाही.
सातारा जिल्ह्यात महायुतीकडून घटक पक्षांना एकत्रित घेत उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाला. या मेळाव्यात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह घटक पक्षांना स्थान देण्यात आले होते. सातारा लोकसभेला महायुतीतून भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गट दावा करत आहे. अशावेळी उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ घेतील असे सांगितले जात आहे. उमेदवार जाहीर नसला तरी तयारी लोकसभेची महायुतीकडून तयारी सुरू आहे. अशावेळी महाविकास आघाडीकडून आपल्या घटक पक्षांना अद्याप एकत्रित आणण्याची प्रक्रियाच झालेली नाही. कोण लढणार, कोणासाठी जागा सुटणार यावर चर्चा झालेली नसून काँग्रेस, शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गट स्वतंत्रपणे भूमिका मांडत आहेत.
महाविकास आघाडीतून सातारा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीला (शरद पवार गट) जाणार आहे. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून अद्याप एकत्रित बैठक, मेळावे झालेले नाहीत. शरद पवार गटाकडून इच्छुकांची संख्या वाढत असताना सहकारी पक्षांना विचारत न घेतल्याने महाविकास आघाडीत सगळेच स्वतंत्रपणे सैरभैर असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसकडूनही जिल्ह्यातील नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोणता मेगा प्लॅन आखला जात आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीची काय भूमिका असणार, उमेदवारीबाबत काय पर्याय आहेत. यावर महाविकास आघाडी म्हणून अद्याप चर्चा, विचारविनिमय न झाल्याने इच्छुक आणि सहकारी पक्ष-गट बुचकाळ्यात असल्याचे दिसत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून पाटण मतदार संघात आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या. त्यानिमित्ताने कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचे मेळावे पार पडले. काँग्रेसकडूनही केवळ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय निश्चय मेळावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित मेळावे होत आहेत. परंतु, यामध्ये स्वतंत्रपणे केवळ राष्ट्रवादीचा विचार होत आहे. महाविकास आघाडी म्हणून ग्राऊंडवर केव्हा एकत्र होणार,असा सवाल आता सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित करू लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.