

नागपूर ः मागील वर्षी दिवाळीच्या वेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी माझ्यासह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले होते. तीन दिवस आम्ही जेलमध्ये होतो. वर्ष उलटले पण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. आज तिवसा न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केले. यावर्षी दिवाळीच्या आधी जर मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केल्या नाहीत, तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
मागील वर्षीच्या दिवाळीला अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधिस्थळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणांसह कार्यकर्ते व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आमदार राणा, त्यांचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांची रवानगी ३ दिवसांसाठी कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी आज तिवसा न्यायालयात करण्यात आली.
न्यायाधीश कोरडे यांनी कलम 341,269,188,143,135 या विविध कलमांतून आमदार रवी राणा, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आमदार राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. दडपशाही करून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य न करता, ऐकुनही न घेता जेलमध्ये पाठवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी दिवाळीपूर्वी मागण्या पूर्ण केल्या नाही, तर त्यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा सणसणीत इशारा आमदार राणा यांनी दिला आहे.
आज न्यायालयाने दिलेल्या निकालावर आमदार राणा व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राणा यांच्या वतीने ॲड. आशिष लांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आमच्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी मागील वर्षीपेक्षाही अधिक तीव्र आंदोलन आता करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. आमदार राणा त्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आग्रही असतात. प्रसंगी आक्रमकही होतात. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्यामुळे आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवले होते. आता खरेच ते मातोश्रीवर आंदोलन करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.