Satara Loksabha Election Result 2024 : बाळासाहेब पाटलांनी शशिकांत शिंदेंचा केला 'गेम'; उत्तर कराडने दिला दगा

Satara Lok Sabha Elections 2024 Winner: मोदी यांची झालेली सभा आणि धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी फिल्डवर उतरत पळून केलेल्या कामामुळेच राष्ट्रवादीचे मताधिक्य घटविण्यात भाजपला यश आले.
Satara loksabha election result 2024
Satara loksabha election result 2024Sarkarnama
Published on
Updated on

Karad News: ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार यांच्या पाठीशी राहिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील या मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने आणि या वेळी पहिल्यांदाच इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केल्याने महाविकासचे उमेदवार शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) मताधिक्य मिळेल, अशी आशा होती.

राष्ट्रवादीच्या अभेद्य किल्ल्याला खिंडार पाडत मागील लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024) राष्ट्रवादीला मिळालेले तब्बल ५० हजारांचे मताधिक्य कमी करण्यात भाजप यशस्वी ठरला. शिंदेंना केवळ 1724 चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे घरच्या आमदाराने शिंदेंचा घात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कऱ्हाडला झालेली सभा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,कऱ्हाड उत्तरचे लोकसभा प्रभारी मनोज घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिल्डवर उतरत पळून केलेल्या कामामुळेच राष्ट्रवादीचे मताधिक्य घटविण्यात भाजपला यश आले.

विधानसभेची लिटमस टेस्ट असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपने आपले बस्तान बसवण्यासाठी टाकलेले फासे योग्य दिशेने पडत असल्याचेच दिसून आले आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे.

या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून आजअखेर पक्षाचे वर्चस्व आहे. येथून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनीही प्रतिनिधित्व केले असून, त्यानंतर ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील आणि सध्या आमदार बाळासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.

आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र असताना त्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सुनील माने यांना देऊन आपला दबदबा ठेवला होता. या मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून धैर्यशील कदम, तर अपक्ष म्हणून मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवली. कदम आणि घोरपडे यांच्या मतांची विभागणी आमदार पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि ते विजयी झाले.

आजअखेर भाजपकडून त्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या मतदारसंघातील विकास कामांमध्ये तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी सरकारमधील मंत्र्यांकडून निधी आणून गावोगावी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा या वेळी लोकसभेच्या निवडणुकीत मताधिक्य कमी करण्यासाठी झाल्याचे दिसत आहे.

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात २०१९ च्या पोटनिवडणुकीत एक लाख ९८ हजार ७७८ मतदान होऊन खासदार श्रीनिवास पाटील यांना एक लाख १४ हजार ६४१, तर खासदार भोसले यांना ६३ हजार ७६२ मते मिळाली होती. खासदार पाटील यांना जिल्ह्यात ८७ हजारांचे लीड मिळाले. त्यात एकट्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघाने त्यांना सर्वाधिक ५० हजार ८७९ मतांची आघाडी दिली होती.

या वेळी मात्र ते मताधिक्य घटविण्यात भाजपच्या नेत्यांनी केलेल्या व्यूहरचनेला यश आले आहे. खासदार भोसले यांचा कऱ्हाड उत्तरमध्ये फारसा संपर्क नव्हता. मात्र, कऱ्हाडला पंतप्रधान मोदी यांची झालेली सभा आणि निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम, लोकसभा प्रभारी घोरपडे, वेताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करून लोकांच्या घरापर्यंत कमळ चिन्ह पोचवल्यामुळे त्याचाही परिणाम खासदार भोसले यांच्या विजयात आहे.

Satara loksabha election result 2024
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील 'हे' आमदार घाबरले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदार पाटील यांनीही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे मताधिक्य कायम राखण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी गावोगावी त्यांच्या यंत्रणेकडून प्रचार करून मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

काँग्रेसनेही या वेळी चांगले काम केले. मात्र, भाजपच्या वारूमुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटले. त्याचबरोबर स्थानिक उमेदवार नसल्याचाही फटका राष्ट्रवादीला बसला. विधानसभेची लिटमस टेस्ट असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून यशवंत विचाराएवजी नरेंद्र मोदींचीच जादू या मतदारसंघात चालल्याचे स्पष्ट झाले.

शिंदेंचे घटलेले मताधिक्य राष्ट्रवादी काँग्रेसला विचार करायला लावणारे आहे. त्याचे परिणाम आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांवरही होण्याची शक्यता आहे.

Edited by: Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com