गिरीश महाजन 'बिझी'...शिवसेना झाली 'अनईझी'!

गिरीश महाजन 'बिझी'...शिवसेना झाली 'अनईझी'!
Published on: 
Updated on: 

नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधांच्या कामांसाठी आलेल्या 23 कोटींच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यास नकार देत पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शिवसेनेची कोंडी करीत असल्याची चर्चा आहे. जनसुविधांच्या कामांना सप्टेंबर अखेरपर्यंत पालकमंत्र्यांची मंजूरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, पालकमंत्र्यांनी हा विषय माझ्यासमोर आणायचा नाही, अशी तंबी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. या मुळे शिवसेनेला शह देण्याच्या प्रयत्नात शिवसेनेची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेची कोंडी झाली आहे.

जिल्हा परिषदेत शिवसेना- काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे विकासकामांसाठी सदस्यांचा दबाव वाढत आहे. मात्र, जिल्ह्यातील जनसुविधेची कामे रखडली आहेत. यामध्ये स्मशानभूमी, संरक्षक भिंत, अभ्यासिका, ग्रामपंचायत कार्यालय, दशक्रिया शेड, कब्रस्तान विकास आदी जनसुविधांची कामे जिल्हा नियोजन मंडळातर्फे केली जातात. या कामांना पालकमंत्र्यांच्या परवानगीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजूरी दिली जाते व ही कामे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत केली जातात. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, ग्रामपंचायतींनी मागणी केलेल्या जनसुविधांच्या कामांना पालकमंत्र्यांची मंजूरी आवश्‍यक असते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची करूनही त्यांना त्यात यश न आल्यामुळे पालकमंत्री जिल्हा परिषदेच्या कामांकडे गांभिर्याने बघत नसल्याचे बोलले जाते.

जनसुविधांच्या कामांना सप्टेंबरमध्ये मंजूरी मिळाल्यानंतर मार्च अखेरपर्यंत ती कामे पूर्ण होणे शक्‍य होते. त्यानुसार लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु, मागील दोन महिन्यांपासून पालकमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना या कामासाठी वेळ नसल्याचे सांगितले जात आहे. मध्यंतरी जनता दरबारासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांना या बाबत अनेक लोकप्रतिनिधींनी विनंतीही केली, परंतु पालकमंत्री 'बघतो, करतो...' अशी उत्तरे देत आहेत.

आमच्या कार्यालयाकडे जिल्हा परिषदेकडून जनसुविधांच्या कामांचे प्रस्ताव मोठ्या संख्येने सादर झाले आहेत. आमच्याकडे लेखापरीक्षण सुरू होते, यामुळे या वर्षी नियोजनाला थोडा उशीर झाला आहे. लवकरच या कामांचे नियोजन अंतिम करण्यात येईल.
- अजय चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी, नाशिक.

 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.