Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर स्थानिक आमदार सुनील शेळकेंसह तालुक्यातील बहुतांश पदाधिकारी अजित पवार (Ajit Pawar) गटात गेल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मावळात पाच महिन्यांनंतरही अध्यक्ष मिळत नव्हता.
याच पार्श्वभूमीवर 'मावळात राष्ट्रवादीला पाच महिन्यांपासून अध्यक्ष नाही' या मथळ्याखाली 'सरकारनामा'ने पाच दिवसांपूर्वी (२७ नोव्हेंबर) बातमी दिली आणि काल (ता.१) राष्ट्रवादीने तालुका अध्यक्ष जाहीर केला. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी तालुकाध्यक्ष पदावर दत्ता पडवळ यांची नेमणूक केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते पुण्यात मोदीबागेत पडवळ यांना आज (ता.२) नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला पुण्यातच गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात गेले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना यांनी येत्या आठ दिवसांत पक्षाचा तालुका अध्यक्ष जाहीर केला जाईल, असे पाच दिवसांपूर्वीच सांगितले होते आणि तसेच झाले. याचबरोबर मावळ तालुका युवक अध्यक्षपदी विशाल वहिले यांचीही पक्षाने निवड केली आहे.
पक्ष मजबूत करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मावळात लीड मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्षपदी नियुक्तीनंतर पडवळांनी 'सरकारनामा'ला शनिवारी दिली. तसेच ''कुणी हे अध्य़क्षपद घ्यायला तयार नव्हते,'' असे ते मिश्किलपणे म्हणाले.
याचबरोबर ही धनशक्तीविरुद्धची लढाई असल्याचेही पडवळांनी या वेळी सांगितले. त्यांचा रोख स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सुनील शेळके यांच्याकडे होता. अजित पवारांनी भाजपबरोबर जाणे मावळवासीय़ांना रुचलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.
याशिवाय ''विकासापेक्षा तत्त्वं महत्त्वाची असून, तीच सोडणे चुकीची असल्याची लोकांची भावना आहे,'' असेही ते म्हणाले. नवलाख उंबरेचे सरपंच राहिलेले पडवळ हे सुरुवातीपासून म्हणजे १९९९ पासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मावळ तालुका युवक अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.