उत्तम कुटे
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यामुळे सोमवारी सायंकाळी भलेमोठे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले,तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान,कोसळलेले हे होर्डिंग अनधिकृत होते असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रात्री 'सरकारनामा'ला सांगितले.
पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad)मधील शेकडो अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न या होर्डिंग दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यावर `जैसे थे` आदेश असल्याने पिंपरी महापालिकेला या अवैध होर्डिंग्जवर कारवाई करता येत नसल्याचे वाघ यांनी सांगितले.शहरात हे एकच नाही,तर असे शेकडो बेकायदेशीर फलक आहेत.परवानगी न घेता ती खासगी जागेत उभारली आहेत.
काही जाहिरात एजन्सी या परवानगीपेक्षा अधिक ती उभारत आहेत.त्यामुळे पालिकेचा महसूलही बुडत आहे.दरम्यान,या अपघाताप्रकरणी रात्री साडेवाजेपर्यंत पोलिसांनी कसलाही नोंद केली नव्हती. तपासानंतर काय तो गुन्हा दाखल केला जाईल,असे स्थानिक रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सरकारनामाला सांगितले.
घटनेचे गांभीर्य ध्यानात घेऊन पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख,पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जितेंद्र वाघ,माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्यप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मात्र, पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी,मात्र दुर्घटनास्थळी भेट न दिल्याने त्याची चर्चा झाली.चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.तर, मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी अनधिकृत होर्डिंग्जवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली.,या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर द्यावी,असेही ते म्हणाले.
कात्रज-देहूरोड बह्यवळण महामार्गावर (मुंबई-बेंगलोर हायवे) किवळे येथे सर्व्हिस रोडवर झालेल्या या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली आहे. शोभा विजय टाक (वय ५०),वर्षा विलास केदारी (वय ५०)अनिता उमेश राय (वय ४५.तिघीही रा. देहूरोड,पुणे),रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९,रा. उत्तरप्रदेश),भारती नितीन मंचक (वय ३३,रा. मामूर्डी)अशी त्य़ांची नावे आहेत.
तर, विशाल शिवशंकर यादव (वय २०, रा.उत्तरप्रदेश),रहमद मोहमद अन्सारी (वय २१,रा.किवळे) आणि रिंकी दिलीप रॉय (वय ४५,रा.देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. दुर्घटनाग्र्स्त अनधिकृत होर्डिंग्ज हे यादव याच्या पंक्चर दुकानापर पडून हा अपघात झाला. वादळी पावसामुळे या पंक्चर दुकानात मृत आणि जखमी हे आश्रयाला थांबले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.