
सिद्धेश्वर मारटकर -
14 मार्चच्या पौर्णिमान्त कुंडलीत मिथुन लग्न उदित असून सिंह राशीत उत्तरा नक्षत्रात पौर्णिमा येत आहे. लग्नस्थानी मंगळ, अष्टमात प्लुटो, भाग्यस्थानी रवी-शनी, दशमात बुध, शुक्र, राहू, नेपच्यून, लाभस्थानी हर्षल व व्ययस्थानी गुरू आहे. लग्नस्थानी मंगळ असल्याने या महिन्यात उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता असून, आग-वाहन दुर्घटना, रेल्वे अपघात, वादळे, भूकंपासारख्या दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
हिंसा, जाळपोळ, स्फोटक घटना, बंद, निदर्शनांतून अशांतता निर्माण होऊ शकते. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित होईल. महागाईत मोठी वाढ संभवते. मोठे वाद, युती-आघाडीत विसंवाद होण्याची शक्यता. पोलिस (Police), लष्करासाठी हा काळ प्रतिकूल. हल्ले होतील. दहशतवादी संघटनांकडून स्फोटक घटना, हिंसेचे प्रयत्न शक्य. मोठे अपघात, नैसर्गिक आपत्तीत (सामूहिक दुर्घटना) मोठी जीवितहानीची शक्यता असेल. मोठ्या व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यूच्या घटना संभवतात.
प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील. मोठे राज्य अस्थिर होईल. केंद्र/ राज्यातील सरकारमधील (Central Government) घटक पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता राहील. एखादे राज्य अल्पमतात येईल. चतुर्थ दशमातून ग्रहणे होत असल्यामुळे मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील. मोठ्या पक्षात फूट पडेल. शेअर बाजार अस्थिर राहून, मोठे ‘करेक्शन’ संभवते. गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होईल. मात्र स्त्रीवर्ग, कलाकारांसाठी हा काळ उत्तम. मोठे पद, मान-सन्मान मिळेल.
११ मार्चपर्यंत शनीचे भ्रमण कुंभ राशीत होणार असून, त्यापुढील अडीच वर्षे शनीचे भ्रमण मीन राशीतून होणार आहे. ११ मार्चनंतर मकर राशीची साडेसाती संपून, मेष राशीला सुरू होईल. तर धनु राशीला ४ थ्या व सिंह राशीला आठव्या शनीचे भ्रमण सुरू होणार आहे. म्हणजे कुंभ, मीन, मेष, धनु, सिंह या राशींसाठी मीन राशीतील शनीचे भ्रमण प्रतिकूल असेल.
(८ ते १४ मार्च २०२५)
मेष : जोडीदारासाठी किंवा कुटुंबासाठी मोठे खर्च करावे लागतील. वैवाहिक जीवनात गैरसमज, रुसवे-फुगवे. मोठे धाडसी निर्णय घ्याल. मात्र नातलगांशी मतभेद संभवतात. घर, वाहन खरेदी-विक्रीसाठी उत्तम सप्ताह. मोठे प्रवास रद्द होतील. विद्यार्थ्यांना परीक्षा तणावपूर्ण.
वृषभ : आर्थिक लाभ मिळण्यासाठी विलंब. मित्रांशी गैरसमज. आर्थिक चणचण भासेल. बोलताना काळजी घ्या. स्पष्टवक्तेपणाने वादविवाद. कुटुंबातील वातावरण गरमागरम. छोटे प्रवास होतील. कलाकारांसाठी सप्ताह उत्तम. मात्र वरिष्ठांशी मतभेद शक्य.
मिथुन : कामात अडथळे. मुलांसाठी खर्च. चिडचिड वाढेल. कुटुंबात चांगले वातावरण राहील. पैशाची कामे होतील. सप्ताहाच्या शेवटी छोटे प्रवास. कायदेशीर कामात यश. मुलाखतींत यश. महत्त्वाची कागदपत्रे पूर्ण.
कर्क : मित्रांशी दुरावा निर्माण होईल. बदनामीपासून सावध राहा. घर, जागेचे व्यवहार रेंगाळतील. कामानिमित्त प्रवास. मात्र चोरांपासून काळजी घ्यावी. शेअर बाजारापासून दूर राहावे. संततीसाठी मोठे खर्च. मुलांची चिंता. सप्ताहाच्या शेवटी पैशाची कामे होतील. विवाह, समारंभ, मनोरंजनातून आनंद.
सिंह : नोकरी व्यवसायात गोंधळ भावंडांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. फसवणुकीची शक्यता. विरोधकांवर विजय. कोर्ट कचेरीत मोठे यश. निवडणुकीत, स्पर्धेत मोठे यश. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या : वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे, गैरसमज. नियोजित विवाहाबाबत पुनर्विचाराची शक्यता. तरुणांची फसवणूक. विवाहेच्छुकांनी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये. व्यवहार काळजीपूर्वक करा. दशमातील चंद्र-मंगळ युती नोकरी-व्यवसायात कष्ट वाढविणारी. वरिष्ठांशी मतभेद. मित्र, सहकाऱ्यांची मदत. मोठा प्रवास, खर्च होतील.
तूळ : आरोग्य बिघडेल. संसर्गजन्य विकार त्रासदायक ठरतील. चुकीच्या मित्रांमुळे नुकसान. व्यसनांपासून दूर रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. चोरीमुळे नुकसान शक्य. विद्यार्थ्यांसाठी कटकटीचा सप्ताह. धार्मिक, मंगल कार्यात अडथळे. कामानिमित्त प्रवास. मित्रांकडून मनस्ताप.
वृश्चिक : शेअर व्यवसायात नुकसान शक्य. विद्यार्थ्यांचा परीक्षेत गोंधळ. प्रेमप्रकरणात मनस्ताप. मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल. आरोग्यासाठी त्रासदायक. प्रवास जपून करा. ज्वर, उष्णतेचे विकार संभवतात. धार्मिक, मंगलकार्य घडेल. महत्त्वाची कामे होतील.
धनु : घर, जागेच्या कामात विलंब. घरात नूतनीकरण, दुरुस्ती. पाहुण्यांमुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता. जोडीदाराशी मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात नुकसान शक्य. मात्र आरोग्य उत्तम राहील. नातलगांच्या गाठीभेटी. मुलाखतीमध्ये यश. मोठी बातमी कळेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार.
मकर : भावंडांत गैरसमज वाढविणारा सप्ताह. प्रवासात काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात गोंधळाचे वातावरण. मानसिक संभ्रम वाढेल. शेअरबाजारात नुकसान. विरोधकांवर मात. स्पर्धा, निवडणूक, कोर्टकचेरीमध्ये यश.
कुंभ : कुटुंबात गोंधळ, समज-गैरसमज. आर्थिक व्यवहार जपून करा. फसवणुकीपासून सावध राहा. घर, जागेच्या व्यवहारात फसवणूक. विद्यार्थ्यांसाठी कटकटीचा सप्ताह. परीक्षेत तणाव. शेअर बाजारात नुकसान. प्रेमप्रकरणात मनस्ताप. तरुणांना नवीन नोकरीची संधी. कोर्टकचेरी, कायदेशीर कामात विलंब.
मीन : आरोग्य बिघडविणारा सप्ताह. विवाहसौख्यात गैरसमज. जमणाऱ्या विवाहात अडथळे. व्हिसा, पासपोर्ट, महत्त्वाची कागदपत्रे मिळण्यास विलंब. घरातील वातावरण बिघडविणारा. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्या. मुलांच्या समस्या सुटतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश. शेअरमध्ये फायदा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.