
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर, दोन्ही पक्षांकडून प्रथमच बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्र लढविण्यात आली. त्यामुळे मुंबईसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे होते. मात्र, या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. तब्बल २८ हजार कामगार सभासद असणाऱ्या या पतपेढीच्या निवडणुकीतील कल हा ठाकरे बंधूंसाठी धक्का असून, त्यांच्यासमोरील आव्हान या निकालातून स्पष्ट होते.
अतिशय प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची निवडणूक नुकतीच झाली आणि त्याच्या निकालाची सर्वत्र चर्चा होत आहे. कामगार नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १४ जागा जिंकत, या निवडणुकीत बाजी मारली. तर, महायुतीच्या पॅनेलला सात जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांनी या निवडणुकीत हातमिळवणी केली होती आणि त्यांनी उत्कर्ष पॅनेल निवडणुकीत उतरवला. मात्र, या पॅनेलला एकही जागा मिळू शकली नाही.
भाषासक्तीच्या विषयावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर, ही निवडणूक झाली. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरच्या या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः मुंबई महापालिका आणि बेस्ट म्हणजे शिवसेना आणि कामगार चळवळ म्हणजे ठाकरे असे समीकरण दिसून येत होते. मात्र, हे समीकरण आता उरलेले नही, हेच स्पष्ट होते. हा निकाल राज्याच्या विशेषतः मुंबईच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाकडे लक्ष वेधत असल्याचे मानले जात आहे. या निकालातून मराठी मतदारांची मानसिकता कशी बदलत आहे, याचा पुरावाही मिळाल्याचे सांगण्यात येते.
मुंबईतील एखाद्या पतपेढीच्या निवडणुकीला इतके महत्त्व का देण्यात आले, हा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे येतो. मात्र, बेस्टमधील कामगारसंख्या, या पतपेढीचे सभासद आणि मुंबईवरील त्याचा प्रभाव यांचा विचार केला, तर त्याचे उत्तर मिळते. बेस्ट पतपेढीचे सुमारे २८ हजार सभासद आहेत. हे सभासद म्हणजे मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी कामगार. शिवसेनेची पाळेमुळे असलेल्या कामगार संघटनांचे हृदयस्थान म्हणून या पतपेढीकडे पाहिले जाते. या पतपेढीमध्ये कोण जिंकतो यावरून मुंबईतील मराठी मतदारांचा कल कुठे आहे, याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळेच या निवडणुकीत झालेला ठाकरे बंधूंचा दारुण पराभव म्हणजे फक्त एका पतपेढीतील अपयश नाही; तर मोठ्या महापालिका निवडणुकीचे ‘ट्रेलर’ आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात मराठी माणसाचा आवाज म्हणजे शिवसेना असे मानले जात होते. लालबागपासून परळपर्यंत, दादरपासून मुंबईच्या सर्व उपनगरांपर्यंत त्याचबरोबर शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि सर्व शहरांपर्यंत मोठा प्रभाव होता. मराठी कामगार, गिरण्या बंद झालेली कुटुंबे कायम शिवसेनेसोबत उभी होती. पण आज हाच वर्ग राजकारण्यांच्या घोषणांवर विश्वास ठेवायला तयार नाही. मराठी मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन आता आश्वासक वाटत नाही. स्थानिकांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलने करण्याची परंपरा थंडावली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे दोन्ही पक्षांचे राजकारण फक्त भावनिक भाषणांपुरते मर्यादित असल्याचे लोकांना जाणवत आहे. त्यामुळे वारसा टिकवण्यात आणि वाढवण्यात दोन्ही पक्ष अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
ठाकरे बंधूंच्या या पराभवाने सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठा मानसिक फायदा मिळाला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित प्रयत्नांनाही लोकांनी नाकारले, अशी भूमिका ते मांडू शकतात. म्हणजे महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेंच्या पक्षाविरोधात ठोस लढा उभा राहण्याची शक्यता कमी आहे. हा संदेश मराठी मतदारांच्या मनात ठसवून देण्याचा प्रयत्न आता भाजप करेल. या निवडणुकीच्या निकालामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याने ते आता त्वेषाने निवडणुकीच्या बांधणीसाठी सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे.
आजचा मराठी मतदार केवळ भाषण, घोषणाबाजी आणि आडनावावर आकर्षित होत नाही. रोजगाराचे ठोस धोरण, मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, शिक्षण व आरोग्यात गुंतवणूक, भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष आहे. या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवाचे हेच खरे कारण आहे, असेही मानले जाते.
‘बेस्ट’ पतपेढीच्या निवडणुकीतून सर्वांत मोठा धडा म्हणजे ठाकरे बंधूंकडील संघटनाशक्ती हरवल्याचे दिसून येते. एकेकाळी हजारो कार्यकर्ते रस्त्यावर आणणारी ताकद आता उरली नाही. राजकीय पक्ष आणि नेत्यांचे नव्या पिढीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांचे प्रश्न कुणी समजून घ्यायला तयार नाही. तरुण मतदारांना फक्त जुना वारसा नको आहे, तर त्यांना भविष्यातील संधी हव्या आहेत. सत्तेपासून दुरावा हादेखील फॅक्टर कारणीभूत ठरल्याचे दिसले. ठाकरे गटांपैकी कोणीही प्रत्यक्ष सत्तेत नाही; लोकांना ‘करून दाखवणारे’ नेतृत्व हवे आहे. ठाकरे यांनी भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण फक्त भावनिक घोषणा पुरेशा नाहीत.
‘जय महाराष्ट्र’, ‘मराठी माणूस’ या घोषणा आता अपुऱ्या ठरत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पण या पराभवानंतर काही समीकरणे स्पष्ट झाली आहेत. ठाकरे बंधूंची एकत्रित ताकदही आता हमखास विजय देऊ शकत नाही. मराठी मतदार आता भाजप-शिंदेंच्या पक्षाकडे वळण्याची शक्यता वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटालाही याचा फायदा होऊ शकतो. यामुळे महापालिकेची निवडणूक आणखी गुंतागुंतीची होणार आहे.
आज सामान्य मराठी मतदाराच्या मनात काही प्रश्न ठळक आहेत. मुंबईतील घरांच्या किमती कमी करण्यासाठी ठाकरे काय करणार? मराठी तरुणांसाठी ठोस नोकरीची हमी कोण देणार? वाहतूक, प्रदूषण, पायाभूत सुविधा यावर कोण उपाय करणार? या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत, तर ‘ठाकरे आडनाव’ हा ब्रँड उपयोगी ठरणार नाही. ही निवडणूक ‘छोटी’ असली, त्यातून ठाकरे बंधूंना धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्यांनी धोरणांमध्ये बदल केला नाही, संघटना मजबूत केली नाही, नव्या पिढीला सोबत घेतले नाही, तर मुंबईच्या राजकारणातून त्यांचे अस्तित्व हळूहळू कमी होत जाईल. याचा विचार आता ठाकरे बंधूंनीही करायला हवा. आपले राजकारण आता मराठी मुद्द्याच्या पलीकडे न्यायाला हवे. विश्वासात वातावरण तयार करायला हवे. भावनिक किंवा संकुचित राजकारणाच्या पलीकडे विचार करावा लागेल.
बेस्ट पतपेढीचा निकाल हा फक्त एक पराभव नाही. तो भविष्यातील राजकारणाचा स्पष्ट इशारा आहे. उद्धव-राज ठाकरे यांनी आता ‘आडनावा’वर नव्हे, तर ‘कामगिरी’वर निवडणुका लढवाव्या लागतील. मुंबईकर आता फक्त घोषणांवर खूष नाही; त्याला ‘परिणाम’ हवे आहेत. मराठी अस्मिता आता कृतिप्रधान राजकारणाशी जोडली जाईल. म्हणजेच, ठाकरे बंधूंची ताकद आता बदलाच्या वळणावर आली आहे. त्यांनी स्वतःला बदलले नाही, तर हा पराभव फक्त झलक ठरेल आणि खरी कहाणी महापालिका निवडणुकीतच दिसेल.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रथमच हातमिळवणी केल्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. मुंबईतील राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मराठी ओळख मिळवून देण्यासाठी राज ठाकरे यांचा करिष्मा उपयोगी ठरेल, तर राज ठाकरे यांना संघटनशक्ती देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आधार मिळेल, असे समीकरण रचले गेले होते. मात्र, या पतपेढीच्या निकालात त्याचा प्रभाव दिसलाच नाही. त्यातून नागरिक फक्त ठाकरे आडनावाने समाधानी नाहीत, हेच दिसून आले. याचा परिणाम पुढे महापालिका निवडणुकीतही होणार का, अशा चर्चेला त्यामुळे तोंड फुटले आहेे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर, तीन दिवसांच्या फरकाने झालेल्या मुंबई महापालिका बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दणका बसला आहे. जय सहकार पॅनेलमधून लढलेल्या या उमेदवारांचा पराभव झाला असून, त्यातून फुटून वेगळा झालेल्या सहकार पॅनेलकडे बँकेची सत्ता गेली आहे. सहकार पॅनेलने १९ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे बँकेच्या तिजोरीच्या चाव्या आता त्यांच्या ताब्यात गेल्या आहेत. दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे जय सहकार पॅनेलमधील सहा उमेदवार विजयी झाले. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवामुळे ठाकरे गटाला सलग दुसऱ्यांदा आर्थिक संस्थांमध्ये धक्का बसला आहे. अगोदर बेस्ट पतपेढी निवडणुकीत अपयश, आणि आता महापालिका बँकेतही जय सहकार पॅनेलमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाच्या उमेदवारांचा धुव्वा उडाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
काही दिवसांत बेस्ट पतपेढी आणि मुंबई महापालिका बँक या दोन्ही महत्त्वाच्या आर्थिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाने संयुक्त पॅनेलसह प्रयत्न केले, भावनिक व मराठी अस्मितेचे आवाहनही केले, मात्र ते मतदारांवर परिणामकारक ठरले नाही. या दोन्ही निवडणुकांतील पराभवामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची काय स्थिती राहणार? हा मोठा प्रश्न आहे. एकेकाळी ‘मुंबई आमचा बालेकिल्ला’ म्हणून दावा करणाऱ्या ठाकरे गटासाठी या अपयशी मालिकेमुळे नव्याने रणनीती आखणे अपरिहार्य ठरणार आहे.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.