
Political Horoscope : सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता महिलांना मंत्रिमंडळात तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर संधी मिळण्याची शक्यता राहील. शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश महिला व कलाकार वर्गासाठी उत्तम राहील. चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल. राज कपूर यांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळेल. सोन्या-चांदीच्या भावांत मोठी वाढ होण्याची शक्यता राहील.
याकाळात रवी-मंगळ षडाष्टक योग होणार असून यामुळे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता असून मोठ्या व्यक्तींचे अपघात या काळात संभवतात. या योगामुळे प्रमुख पक्षांत फूट पडण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या नेत्यांनी पक्षाला रामराम करण्याची शक्यता राहील.
या योगामुळे जातीय वादविवाद निर्माण होऊन दोन गटांत चकमक होण्याची शक्यता राहील. काही धार्मिक स्थळांवरून मोठे वादविवाद होतील. मंदिरे, धार्मिक स्थळांत घातपात घडविण्याचे प्रयत्न होतील. पुढील महिन्यात होणाऱ्या कुंभ मेळ्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. घातपात, अपघात किंवा चेंगराचेंगरीमधून जीवित हानी होण्याची शक्यता राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रमुख व्यक्तींचे राजीनामे, रुसवे फुगवे अनुभवास येतील. पक्षांतराच्या घटना या काळात संभवतात. लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. काही महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर पडतील, रद्द होतील.
या सप्ताहात विरोधी पक्ष आक्रमक होईल. महिलांचा प्रश्न उपस्थित होतील. चित्रपटांवरून वादविवाद होतील. या काळात एखाद्या कलाकारावर कारवाई होईल. या आठवड्यात थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता असून, थंडीमुळे होणाऱ्या विकारांत वाढ होईल. वाढत्या थंडीचा परिणाम हवाई वाहतुकीवर होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना शक्य आहे. वैमानिकांचे संप, बंद या काळात संभवतात.
या सप्ताहात मोठे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता असून, त्यावर दीर्घकाळाची चर्चा सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये होईल. विरोधी पक्षांचा या विधेयकाला तीव्र विरोध होईल. बहुमताअभावी महत्त्वाचे विधेयक लांबणीवर पडण्याची शक्यता वाटते. रवी-मंगळ अशुभ योगामुळे सत्ताधारी पक्षाला मोठा विरोध होऊ शकतो. सहकारी पक्षांची भूमिका विरोधात जाण्याची शक्यता राहील. सत्ताधारी आघाडीमधील फूट अनुभवास येईल.
बुध-गुरू योगामुळे या काळात साहित्य संमेलने, पुस्तक प्रदर्शन यांना मोठा प्रतिसाद मिळेल. लेखक, साहित्यिक, पत्रकार, प्रसारमाध्यमांतील व्यक्तींचा मोठा गौरव होईल. प्रदर्शने, व्याख्यानमाला, संमेलने, संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल या सप्ताहात अनुभवास येईल. रसिक व श्रोत्यांना डिसेंबरचा शेवट मोठी मेजवानी मिळेल.
जनतेसाठी हा सप्ताह आनंददायक राहणार आहे. नाताळाची सुटी असल्याने सहली, मनोरंजन, गेटटुगेदर, पार्टी यातून मोठा उत्साह दिसून येईल. हॉटेल, ट्रॅव्हल सारख्या व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला घसरण होऊन उत्तरार्धात मोठी तेजी राहील. मंगळ वक्री असल्यामुळे खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या स्पर्धेत अपयश येण्याची शक्यता असून काही खेळाडूंवर बडतर्फीचा निर्णय होईल. मोठ्या खेळाडूंना अपघात किंवा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागेल.
मेष : सप्ताहाच्या सुरुवातीला थोडे नैराश्य राहील. तब्येतीची तक्रार जाणवेल. सप्ताहाच्या मध्यावर पैशाची कामे होतील. जोडीदाराची उत्तम साथ. मोठा लाभ मिळेल. जुने मित्र भेटल्याने आनंदी व्हाल. तरुणांचे विवाह जमतील.
वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांची चिंता वाटेल. विद्यार्थ्यांना परीक्षेचे ‘टेन्शन’ राहील. शेअरबाजारात नुकसान संभवते. सप्ताहाच्या मध्यावर तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल.
मिथुन : सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण दूषित राहील. नोकरी-व्यवसायात गोंधळाची स्थिती दर्शविते. मात्र सप्ताहाच्या मध्यावर मुलांकडून चांगली बातमी कळेल. शेअर व्यवसायात फायदा होईल.
कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास होतील. मात्र नातलगांबरोबर दुरावा संभवतो. सप्ताहाच्या मध्यावर पाहुण्यांची वर्दळ राहील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे होतील.
सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक चिंता दर्शविते. मोठा खर्च होईल. नोकरीची चिंता राहील. मात्र सप्ताहाच्या मध्यावर नातेवाइकांची मदत मिळेल. इच्छुकांचे विवाह जमतील. व्यापारात मोठा फायदा मिळेल.
कन्या : जोडीदाराशी मतभेद, गैरसमज होतील. व्यवसायात गोंधळ, मनस्ताप, फसवणुकीचे अनुभव येतील. मोठे कर्ज मंजूर होईल. नोकरीमध्ये मनासारखे बदल होतील.
तूळ : शेअर्समध्ये फायदा होईल सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होण्याची शक्यता असून, प्रवासात किमती वस्तूंची काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून प्रेमात पडाल.
वृश्चिक : वाहन/जागा खरेदी होईल सप्ताहाच्या सुरुवातीला मित्राशी दुरावा संभवतो. येणी वसूल होण्यात अडचणी येतील. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो. वाहन/जागा खरेदी होईल.
धनू : सप्ताहाच्या मध्यावर जुने मित्र, नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. सहली/छोटे प्रवास होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखन, कला, प्रसिद्धी यातून आनंद मिळेल.
मकर : सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्य/तीर्थयात्रा होण्याची शक्यता असून, प्रवासात अडथळे येतील. कामे अर्धवट झाल्याने मनस्ताप होईल. कुटुंबात आनंदाची बातमी कळेल. नोकरीत पगारवाढ होईल.
कुंभ : सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावा. पायाचे, पोटाचे दुखणे संभवते. सप्ताहाच्या मध्यावर मनासारख्या घटना घडतील. उंची वस्तू, वस्त्रालंकारांंची प्राप्ती होईल. कला/संगीत/मनोरंजन यातून आनंद घ्याल.
मीन : मोठे प्रवास/ मोठी खरेदी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी दुरावा संभवतो. आरोग्याविषयी भीती निर्माण होईल. सहली/ मनोरंजन यातून आनंद मिळेल. मोठी खरेदी होईल. उत्तरार्धात मुलांशी मतभेद टाळावेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.