Ex.Divisional Commissioner News : सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांना राजकीय क्षेत्रात आणि खासगी क्षेत्रात पैसा, मानसन्मान आणि मोठ्या संधी उपलब्ध असतात. प्रशासनातील कामाचा प्रचंड अनुभव गाठीशी असल्याने मानमरातब आणि ओळखीही असतात. यामुळे कोणत्याही आयएएस, आयपीएस म्हणून काम केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजातून निवृत्तीनंतर राजकीय अथवा खासगी क्षेत्र खुणावते. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत अनेक माजी सनदी अधिकारी इच्छूक उमेदवार म्हणून पक्षांकडे रांगा लावून आहेत. परंतु याला काही अधिकारी अपवादही असतात, जे शेती आणि मातीत रमतात. यापैकीच एक म्हणजे संभाजीनगर महसूल विभागाचे माजी आयुक्त सुनील केंद्रेकर.
शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेले केंद्रेकर (Sunil Kendrekar) सध्या त्यांच्या गावी शेतीत रमले आहेत. परभणी जिल्ह्यातील झरी येथील शेतकरी व्यवसाय असलेल्या कुटुंबात केंद्रेकर यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचे पहिले प्रमे हे शेतीवरच. स्वेच्छानिवृत्तीनंतर आपण अध्यात्म आणि शेतीत स्वतःला गुंतवूण घेणार, असल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानूसार ते सध्या आपल्या शेतातील सगळी कामे करण्यात मग्न आहेत. सुनील केंद्रेकर यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण परभणी (Parbhani) येथील शिवाजी महाविद्यालयात झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजीनगर (Sambhajinagar) येथे अध्यापनाचे काम केले. यादरम्यान त्यांची भेट शास्त्री नावाच्या पोस्टमनशी झाली. केंद्रेकर यांनी स्पर्धा परीक्षा द्यावी, असा आग्रह शास्त्री यांनी केला. युवकांनी स्पर्धा परीक्षेला गवसणी घालावी व समाजात विधायक बदल घडवून आणावेत ही त्यांची तळमळ. केंद्रेकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 2002 मध्ये त्यांची आयएएस (IAS) पदी निवड झाली.
राज्यातील विविध ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर संभाजीनगर विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मुळचे शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडीअडचणींनी जाणीव होती. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल केंद्रेकर यांनी राज्य शासनाकडे अहवाल सादर केला होता. मात्र या अहवालावर चर्चा, मंथन न होता टीका आणि राजकारण झाले. केंद्रेकर यांचा अहवाल शासनाने स्वीकारला नाही. पण स्वेच्छानिवृत्तीनंतर शेतीच करणार असं ठामपणे सांगणारे केंद्रकर (Sunil Kendrekar) खरंच शेतीत रमल्याचं पाहायला मिळत आहे.
परभणी तालुक्यातील झरी येथे त्यांची 27 एकर शेती आहे. शेतीतील सर्व कामे ते स्वत: करतात. त्यांच्या पत्नी धनश्री केंद्रेकर यांचीही त्यांना खंबीर साथ मिळत आहे. शेतीतील विविध प्रयोगासाठी ओळखले जाणारे केंद्रकर यांनी आसाम येथून हळदीचे नवीन वाण आणले आहे. निसर्गाचा समतोल राखत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शेती व्यवसायाबाबत जो नकारात्मक सूर ऐकू येतो तितकी परिस्थिती बिघडली नसून प्रत्यक्ष बांधावर जाऊन मेहनत केली तर शेती हा व्यवसाय नक्कीच फायद्याचा असल्याचे मत केंद्रकर यांनी व्यक्त केलं.
तसेच बाजार समितीची यंत्रणा शेतकऱ्यांच्या प्रगतीतील अडथळा असून यामध्ये बदल केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एकूणच राजकीय किंवा खासगी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असताना शेतीमध्ये रमणारे सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर व त्यांच्या बरोबरीने शेतीव्यवसायात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी धनश्री केंद्रेकर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.
(Edited By - Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.