Dombvali News : खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची शिक्षा आता सर्व शासकीय कार्यालयाला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्यामुळे तेथील कामकाजावर परिणाम झाला असून संथगतीने कारभार सुरू आहे. यामुळे परवानाधारक, वाहनचालकांची तारांबळ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वेळेत काम होत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधीच कामाची हौस असणाऱ्या अधिकारीवर्गाला कर्मचारी कमी असल्याचे कारण मिळाले आहे.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ३० पैकी १९ कर्मचारी मराठा, खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण (Maratha survey) करण्यासाठी महसूल विभागाने वेगवेगळ्या भागात नियुक्त केले आहेत. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (RTO) कार्यक्षेत्र कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड आहे.
या भागातून वाहनचालक, मालक आपल्या वाहनाचे नूतनीकरण, परवाना, नोंदणी पुस्तिका घेण्यासाठी, शिकाऊ वाहन प्रशिक्षणासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज फेऱ्या मारत आहेत. परंतु, कामे करण्यासाठी कार्यालयात कर्मचारीच दिसत नसल्याने नागरिकांना कार्यालयातून माघारी परतावे लागत आहे.
केवळ सात ते आठ कर्मचारी विविध खिडक्यांवर काम करताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर विविध प्रकारची कामे घेऊन वाहनचालक, रिक्षाचालकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. अनेक खिडक्यांवर लिपीक, अधीक्षक अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक काम करताना दिसत आहेत. खिडकीवर गर्दी नको, म्हणून ऑनलाईन माध्यमातून कामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांकडून वाहनमालकांना केल्या जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर्मचाऱ्यांअभावी आरटीओ कार्यालयात विविध प्रकारच्या कामांच्या फायलींचे ढीग टेबलवर साचले आहेत. शहापूर, मुरबाड भागातून आलेल्या नागरिकांना आरटीओ कार्यालयात काम होत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय नको, म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारीप्रमुख विनोद साळवी स्वतः विविध विभागात फिरत आहेत. त्या परिस्थितीत नागरिकांची कामे करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करीत आहेत.
(Edited By : Sachin Waghmare)
R...