

Satara SSC exam controversy : सातारा जिल्ह्यात फलटन तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीचा मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर शिक्षण विभागाचा जिल्ह्यास्तरावरील अहवाल कोल्हापूर विभागाला देण्यात आला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर विभागीय मंडळाने केलेल्या चौकशीची अहवाल समोर आला आहे. यामध्ये दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासले नसल्याचं स्पष्टीकरण मंडळाने दिलं आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 1011, उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी, ता. फलटण, जि. सातारा या केंद्रावर मराठी विषयाचे परीक्षक वैभव शेंडे यांनी मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याची तसेच हिंदी विषयाचे शिक्षक धनाजी नेरकर हे हिंदी विषयाच्या पेपरवेळी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने उपस्थित असल्याची तक्रार मंडळास प्राप्त झाली होती. त्याचा तपास करण्यात आला आहे.
त्यानुसार शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सातारा व गटशिक्षणाधिकारी, फलटण यांना तात्काळ भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दि. 09 मार्च रोजी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली केली. या चौकशीत, धनाजी नेरकर हे हिंदी विषयाच्या पेपर दिवशी पेपर सुरू होण्यापूर्वीच परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.
त्यामुळे परीक्षेच्या कामकाजात किंवा गोपनीयतेत कोणताही व्यत्यय आलेला नाही. मात्र, वैभव शेंडे यांनी उत्तरपत्रिका तपासताना दोन विद्यार्थिनींकडून उत्तरपत्रिकेवर रेषा मारून घेतल्याचे आढळलं. मात्र हा अहवाल अपूर्ण असल्याने तसेच CCTV फुटेज प्राप्त नसल्याने विभागीय मंडळाने द्विसदस्यीय चौकशी समिती नेमून13 मार्च रोजी संबंधित परीक्षा केंद्रावर फेरचौकशी केली.
त्यामध्ये मराठी विषयाचे परीक्षक वैभव शेंडे यांनी मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासताना इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींकडून उत्तरपत्रिकेवर रेषा मारून घेतल्या असल्याचे आढळले. उत्तरपत्रिका तपासणीसारख्या गोपनीय कामात अन्य व्यक्तींची मदत घेणे ही चूक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र विद्यार्थिनींनी फक्त कोऱ्या पानांवर रेषा मारल्या असून उत्तरपत्रिका तपासलेल्या नाहीत, हे चौकशीत स्पष्ट झाले.
मात्र, परीक्षक शेंडे यांनी उत्तरपत्रिका हाताळण्यास विद्यार्थिनींना दिल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे मान्य करून, मंडळाच्या शिक्षासूची परिशिष्ट भाग-1 (अ-4) क्र. 24 नुसार त्यांचे उत्तरपत्रिका तपासणीचे संपूर्ण मानधन जप्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या अटी) नियमावलीनुसार त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत संबंधित संस्थेला कळवलं असून त्यांनी तपासलेल्या मराठी विषयाच्या 125 उत्तरपत्रिका मंडळाने ताब्यात घेतल्या आहेत.
शिवाय त्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. तसंच संबंधित विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची पूर्ण दक्षता विभागीय मंडळाकडून घेण्यात येईल, असं आश्वासन कोल्हापूर विभागीय सचिव व विभागीय अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.