

राज्यातील महिला व बाल विकास विभागाच्या ३०हून अधिक योजना आणि कायद्यांची अंमलबजावणी आता ‘डब्ल्यूसीडी आय-वॉच’ पोर्टलमुळे डिजिटल होणार आहे. यामुळे मंत्रालयापासून जिल्ह्यापर्यंतची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होऊन कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी एकात्मिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील विविध यंत्रणांकडून येणारी माहिती एकत्रित करणे आणि तिचे विश्लेषण करणे हे विभागासमोरील मोठे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी ‘डब्ल्यूसीडी आय-वॉच’ (इंटिग्रेटेड वूमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट इन्फॉर्मेशन अँड मॉनिटरिंग सिस्टिम) हे पोर्टल महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रणालीमुळे निर्णय प्रक्रियेला वेग येण्यासोबतच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला मोठी चालना मिळणार आहे.
या पोर्टलमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वतंत्र युझर आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत. राज्यभरातील सुमारे दोन हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी या प्रणालीमध्ये नियमित माहिती भरणार आहेत. पोर्टलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रशिक्षण सत्रेही घेतली आहेत.
यापूर्वी होती अशी पद्धत
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून माहिती प्रत्यक्ष व्यक्तींना गोळा करावी लागत होती. अनेकदा यामध्ये चुका झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात निरोप दिल्यानंतर सर्व जिल्ह्यांची माहिती गोळा होण्यासाठी मोठा अवधी जात होता, यामुळे अपेक्षित वेळेत काम पूर्ण होत नव्हती, असे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
‘डब्ल्यूसीडी आय-वॉच’ पोर्टलमुळे विभागाच्या कामकाजात डेटा आधारित नियोजन, प्रभावी देखरेख, तत्पर निर्णय प्रक्रिया, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. तसेच विभागाच्या सेवा अधिक परिणामकारक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हे पोर्टल महत्त्वपूर्ण ठरेल. - जगदीश मिनियार, आयुक्त, महिला व बाल विकास
पोर्टलच्या माध्यमातून माहिती संकलन आणि पडताळणीसाठी कार्यपद्धती निश्चित
प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत क्षेत्रीय स्तरावरील माहिती अपलोड होणार
आठ तारखेला जिल्हास्तरावर पडताळणी होईल
नऊ तारखेला आयुक्तालय स्तरावर डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांचा आढावा
मंत्रालय स्तरापर्यंत आवश्यक लॉगिन सुविधा उपलब्ध
कोणत्याही योजनेची किंवा कायद्याच्या अंमलबजावणीची अद्ययावत माहिती उपलब्ध
माहिती सुरक्षितपणे जतन केली जाणार
कोणत्याही वर्षातील किंवा महिन्यातील माहिती भविष्यात सहज उपलब्ध होऊ शकेल