कडूस (जि. पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन आठवडा उलटला, पण अजूनही तालुक्यात निवडणुकीत झालेल्या पैशांच्या वापराची चर्चा झडत आहे. मतासाठी ‘पाकीट' वाटपाची उमेदवारांची कोटीच्या कोटींची उड्डाणे झाली, तर मतदार लखपती झाले. अमिषांच्या एवढ्या दलदलीतही तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतके मतदार मात्र पाकिटांपासून दूर राहिले. नम्रपणे पाकिटे नाकारणाऱ्या त्या काही प्रामाणिक मतदारांच्या नावांची चर्चा तालुक्यात होत आहे. (50 crores turnover discussion in Khed Bazar Committee elections)
खेड (Khed) तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची (Bazar Samiti) निवडणूक ‘पाकिट’च्या खैरातीने गाजली. निवडणुकीला आठ दिवस झाले, पण निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या खर्चाच्या तर मतदारांना मिळालेल्या लाभाच्या आकडेवारीची तालुक्यात चर्चा होत आहे. पाकिट संस्कृतीची झळ खुद्द आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनासुद्धा बसली. त्यांच्या पॅनेलचे निवडून आलेले सर्व उमेदवार मतदानात त्यांच्यापेक्षा निम्म्याने पुढे आहेत. निवडून येण्यासाठी कोणी किती रुपयांचे व किती पाकिटे भरली याची खमंग चर्चा तालुक्यात होत आहे.
निवडणुकीवर सुमारे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. निवडून येण्यासाठी पाच हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत पाकिटे भरल्याचे किस्से ऐकू येत आहे. एक दोन नव्हे; तर एकाएका उमेदवाराने तब्बल हजार अकराशे मतदारांपर्यंत पाकिटे पोच केल्याचे किस्से आता बाहेर येत आहेत. सोसायटी गटातील मतदाराच्या लाभाची गोळाबेरीज दीड ते दोन लाखांच्या घरात पोचली आहे, तर ग्रामपंचायत गटातील मतदारांची मिळकत पन्नास हजारांच्या पुढे गेल्याचे अनेक मतदार खासगीत मान्य करीत आहे.
निवडणुकीतील अमिषांच्या या दलदलीत तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही मतदार मात्र लोकशाहीबाबत प्रामाणिक राहिले आहेत. त्या मतदारांच्या नावांची चर्चा तालुक्यात होत आहे. त्यात दोंदे गावचे माजी सरपंच दत्ता शितोळे, जिल्हा बँकेचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर काळे, बहिरवाडी येथे पाझर तलाव व्हावा, यासाठी तीस वर्षांपूर्वी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते व बुट्टेवाडी गावचे गोविंदराव बुट्टे यांच्या नावांचा सहभाग आहे.
दोंदेचे सरपंच चंद्रकांत बारणे यांनी ग्रामदैवताच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी मिळालेली रक्कम ग्रामस्थांकडे सुपूर्द केली आहे, तर कोरेगावच्या कामिनी गोगावले यांनी अनाथाश्रमातील मुलांसाठी रक्कम दिली आहे.
या ‘पाकीट’ संस्कृतीबाबत दोंदे सोसायटीचे दत्ता शितोळे म्हणाले की, ‘मतदान हे एकप्रकारचे दान आहे. परंतु या निवडणुकीत त्याचा बाजार झाल्याचे पाहायला मिळाले. असे प्रकार लोकशाहीला घातक आहेत. तरुणांसमोर आदर्श निर्माण होईल, असे वर्तन झाले पाहिजे. माझ्या बुद्धीला जे पटले तेच मी केले. अनेक जण पाकीट घेऊन यायचे. पण, एकाच्याही आमिषाला बळी पडलो नाही, याचा अभिमान आहे.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.