मंचर : "शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेबरोबर गद्दारी करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी कोठूनही निवडणूक लढवावी. त्यांना निष्ठावंत शिवसैनिक पराभूत केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत. शिवसेना पूर्वी अधिक ताकतवान होती. पण २००४ मध्ये आढळराव सेनेत आले. त्यांना तीन वेळा खासदार केले. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यात सतत भांडणे लावण्याचे काम केले.
त्यांच्या जाण्यामुळे काहीच फरक पडणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिक जागेवरच आहेत. फक्त आढळराव सेना निघून गेली आहे. शिवसैनिकांनी आजपासूनच पक्ष संघटना मजबुतीसाठी कामाला लागावे," असे आवाहन शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) यांनी केले. (Shirur Shivsena, Ravindra Mirlekar Latest News)
मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिर्लेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, माजी जिल्हाप्रमुख अँड. अविनाश राहणे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले, गणेश कवडे, बाळासाहेब वाघ, कल्याण हिंगे, अजित चव्हाण, बाळासाहेब पवळे, बबनराव गव्हाणे, कलावती पोटकुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मिर्लेकर म्हणाले, 'आढळराव पाटील खासदार झाल्यापासून उतरती कळा लागली. त्यांनी फक्त आढळराव सेना वाढविण्याचे त्यांनी काम केले. अलिबाबा ४० चोरांच्या टोळीत ते सहभागी झाले. यापुढे शिवसैनिकानी पक्षप्रमुखांना साथ देण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले की, आढळराव पाटील पक्षनिष्ठेबद्दल वारंवार सांगत होते. पण ज्याप्रमाणे भारतातून इस्ट कंपनी गेली. त्याप्रमाणे आढळराव गेल्यामुळे खऱ्या अर्थाने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्ट्रॉंग होईल. आढळराव यांनी चिंतन बैठक बोलावली, असे समजते पण ती चिंता वाढवणारीच ठरेल असा टोलाही त्यांनी आढळरावांना लगावला. यावेळी मंचर शहर प्रमुख संदीप जुन्नरे यांनी स्वागत केले तर सचिन बांगर, भोर, रहाणे, बाणखेले आदींचीही यावेळी भाषणे झाली.
आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार
“शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार आहे. शिवसेनेने ज्यांना मोठे केलं त्यांनीच भाजपच्या पदरा आड लपुन शिवसेने विरोधात कट कारस्थान केले आहे. भाजपचा पदर बाजूला काढा व मैदानात या तुम्हाला शिवसैनिक घरचा रस्ता दाखवतील, असे आवाहन सचिन आहिर यांनी बंडखोर आमदार खासदारांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.