Sharad Pawar Withdraw Resignation : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे मंगळवारी (ता. २) मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच पुढील अध्यक्ष निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, असेही जाहीर केले. शरद पवार यांनी अचनाकच अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला होता.
पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचा राष्ट्रवादी पक्षातील (NCP) सर्व नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला. आम्हाला तुम्हीच पक्षाचे अध्यक्ष म्हणून हवे आहेत, अशी आग्रही भूमिका रज्यभरातील कार्यकर्त्यांनी मांडली. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, शरद पवारांनी सर्वांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. तसेच त्यांना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. तसेच अन्नपाण्याचा त्याग करून वाय. बी. सेंटरवरच ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले.
शरद पवार त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी गेल्यानंतर कार्यकर्त्यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही कार्यकर्त्यांपुढे हतबल झाल्या. दरम्यान, शरद पवारांचा निरोप घेऊन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), ज्येष्ठ नेते जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे पुन्हा कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले. त्यावेळी खासदार सुळे यांनी पवार आणि कार्यकर्त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले.
यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना राजीनीमे थांबविण्याचे आवाहन केले. यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांकडे निर्णयचा फेरविचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्याचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
मागितलेल्या मुदतीनुसार गुरुवारी (ता.४) पवार यांनी स्वतः वाय.बी. सेंटरवर येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका कार्यकर्त्याने रक्ताने लिहिलेले पत्र पवारांना देण्यात आले. तसेच अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला नाहीतर ६ मे पासून आमरण उपोषण करणार असल्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोरच दिला होता. त्यावेळी पवारांनीही तुमच्या भावानांचा आदार करूनच निर्णय घेतला जाईल. तसेच यापुढे तुम्हाला आंदोलनासाठी बसावे लागणार नाही, असे पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अध्यक्षपदाचा पेच सोडविण्यासाठी नेमलेल्या समितीने शुक्रवारी (ता. ५) सकाळीच शरद पवार (Sharad Pawar) यांचा निर्णय नामंजूर करण्याचा ठराव केला. या ठरावाचे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. या ठरावानंतर पवार काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
दरम्यान, एका कार्यकर्त्याने शुक्रवारी सकाळी आत्मदनाचा प्रयत्न केला होता. पवार यांनी आपला निर्णय शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिला. यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच यापुढे जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगून पुढील दौऱ्याची माहिती दिली.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.