Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांचे वय झाले त्यांनी थांबायला हवे, असे विधान देखील केलं होते. आता या दोन्ही विधानांचा समाचार रोहित पवार यांनी घेतला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त गुरुवारी रोहित पवार पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील इतर नेते अजित पवार यांच्यावरती थेट टीका करताना दिसत नाहीत. मात्र, रोहित पवार हे अजित पवारांचा समाचार घेताना दिसत आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले सुप्रिया सुळे, जयंत पाटील, एकनाथ खडसे यासारखे ज्येष्ठ नेते हे पक्ष बांधणी पक्ष उभारणीसारखं महत्त्वपूर्ण काम करत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडे भाष्य करण्यासाठी वेळ नसेल त्यामुळे मी बोलत असल्याचे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले.
रोहित पवार पुढे म्हणले, आम्ही बच्चे आहोत, लहान आहोत, असे काही लोक सांगतात. माझं वय सध्या ३८ आहे. या वयात शरद पवार हे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते. अजित पवार हे जेव्हा पवार साहेबांविषयी बोलतात तेव्हा त्यांचं वय जास्त असल्याचे सांगतात. पण मला असं वाटतं की, कोणाचं वय ६५ आहे, कोणाचं ७० आहे, कोणाचं ६३ आहे. आपलं वय जसं वाढेल तसतसे आपलंच वय योग्य आहे, बाकी मुलामुलींचं आणि नेत्यांचं वय अयोग्य आहे, असे अजित पवार यांचे मत असावे असं रोहित पवार म्हणाले
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'अजित पवार यांचेच वय योग्य'
रोहित पवार (Rohit pawar) पुढे म्हणाले, त्यामुळे सगळ्याच गोष्टी, सगळीच पदं आपल्याला मिळावीत. त्यासाठी आपले वय नेहमीच योग्य असेल, सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी फक्त अजित पवार यांचेच वय योग्य आहे. त्यांच्यापेक्षा लहान नेते हे बच्चे, तर त्यांच्याहून वयाने मोठे नेते हे ज्येष्ठ ठरतात. केवळ अजित पवार (Ajit pawar) यांचेच वय सर्व गोष्टींसाठी योग्य आहे, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली.
(Edited by Sachin Waghmare)