Shirur Lok Sabha Constituency 2024
शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency 2024) महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, महायुतीकडून अद्यापही उमेदवार कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत, तर दुसरीकडे उमेदवारांची अदलाबदल केली जाणार असल्याची चर्चाही रंगत आहे, अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज अमोल कोल्हेंच्या होमपीचवर सभा होत आहे. आजच्या सभेतून अजित पवारांच्या टार्गेटवर अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि आमदार अशोक पवार असतील, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मंचरमधील सभेनंतर आज अजित पवारांची सभा होत आहे. या सभेत अजितदादा कुणावर टीकास्त्र डागणार याबाबत उत्सुकता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अजित पवारांच्या सभेतून शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना, चास-कमान पाणी, आमदार अशोक पवारांनी सोडलेली साथ असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत. अजितदादा शिरूरचा उमेदवार जाहीर करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ दिली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची मंचर (ता. आंबेगाव) येथे नुकतीच जाहीर सभा झाली.
शिरूरमध्ये आघा़डीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी फिक्स आहे, तर आघाडीत ही जागा कोणी लढवायची यावरूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.
शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (ShivajiRao AdhaRao Patil) यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले, माजी आमदार विलास लांडे यांनी शिवाजीराव आढळरावांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे. अमोल कोल्हे विरोधात महायुतीकडून उमेदवारांची अदलाबदल करून आयात उमेदवार देण्याची चर्चा सुरू असताना अजित पवार गटातील कार्यकर्ते मान्यता देतील की नाही, याबाबत संभ्रम असल्याची भूमिका आहे. विलास लांडे यांनी आढळरावांना अप्रत्यपणे विरोध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.