Shirur Political News : शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख बंदोबस्त केल्याची चर्चा आहे. आता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भर पावसात सांगता सभा घेतली. या वेळी अजितदादांनी कोल्हे यांच्यावर नट, अभिनेता, नाटककार म्हणत ते काही कामाचे नाहीत, अशी सडकून टीका केली.
अजित पवारांच्या खेड तालुक्यातील चाकण येथील सभेपूर्वी जोरदार पाऊस पडला. त्या पावसातही अजितदादांनी स्टेज सोडले नाही. पाऊस उघडल्यानंतर अजितदादांनी शिवाजीराव आढळराव पाटलांसाठी Shivajirao Adhalrao Patil जोरदार बॅटिंग केली. तर अमोल कोल्हे यांना धारेवर धरले. ते म्हणाले, विकासकामे करताना आपल्यात धमक आणि ताकद नेतृत्वात असायला हवी. शिरूर मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी काही हजार कोटी दिले आहेत. मात्र आता अंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विलंब झाला. त्यासाठी माझी, सहकाऱ्यांची चूक आहे, ती मान्य आहे. मात्र ते काम पुन्हा करण्याची धमक आमच्यातच आहे. ते कुणा येऱ्या गबळ्याचे काम नाही. नट करूच शकत नाही. अभिनेता ते काम करू शकत नाही, असे म्हणत कोल्हेंवर निशाण साधला.
नाटककार फक्त डायलॉग फेकतात. ते विविध भूमिका वटवतील. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची भूमिका करतील. वेळ पडली तर पैशांसाठी नथुराम गोडसेंचीही भूमिका करतील. लाज वाटायला पाहिजे त्यांना. ज्यांनी महात्मा गांधींची खून केला, त्या नथुराम गोडसेंची भूमिका तुम्ही करता. एवढे तुम्ही पैशासाठी हपापला आहात. पैसे घेऊन वर घेऊन जाणार आहात का. काही तरी माणुसकी हवी की नको, अशा शब्दात अजितदादांनी कोल्हेंना Amol Kolhe सुनावले आहे.
गेल्यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. त्यांना उमेदवारी दिली. निवडणुकीचा खर्च मी आणि दिलीपराव वळसे पाटलांनी केला. त्यांचा एक रुपया खर्च होऊ दिला नाही. ती आमची जबाबदारी होत, ती पार पाडली. मात्र आदिवसी, डोंगरी भागातील आदिवासींच्या समस्या, पिण्याच्या पाणी, शेतीच्या पाण्याची, विजेची समस्या सुटल्या नाहीत. केटीवेअरच्या दुरुस्तीचे कामासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, अशी टीकाही अजित पवारांनी Ajit Pawar केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याबाबत विचारले असता त्यांच्याकडून मुंबईत शुटींग सुरू आहे. तेथे सेट लागलेला आहे. नाही गेलो तर त्यांचा खर्च वाया जाईल, अशी उत्तर येत होती. आशा व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून काही कामाच्या नाहीत. त्यामुळे भावनिक होऊ नका. जातीचा, पातीचा, नात्याच्या गोत्याचा विचार करू नका, असे म्हणत आढळरावांना चौकार मारण्यासाठी मतदान करा, असे आवाहन अजितदादांनी केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.