Pune News : आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात युती आणि आघाडीचे जागावाटपाची चर्चा सुरु आहे. युतीतील हा तिढा बहुतांश सुटला असून थोडा बाकी आहे, अशी कबुली देत तो सुद्धा लवकरच सुटेल, असा आशावाद अजित पवार यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केला.
तसंच बारामतीतून निवडणूक लढणार की नाही, यावर महायुतीत ही जागा कोणाला सुटते आणि पक्ष काय निर्णय घेतो, त्यानुसार उमेदवार दिला जाईल, असे सांगून अजितदादांनी बारामतीमधून निवडूक लढवण्याबाबत सस्पेन्स वाढवला.
पिंपरी-चिंचवडमधील 1700 कोटी रुपयांच्या विकासकामांची ई-उद्घाटन आणि भूमिपुजनानंतर अजितदादा (Ajit Pawar) मीडियाशी बोलत होते. विधानसभेची आचारसंहिता येत्या चार-पाच दिवसांत लागण्याची शक्यता, त्यांनी यावेळी वर्तवली. यामुळेच सध्या आमची (सरकारची) धावपळ सुरू आहे, असे ते म्हणाले. बापदेव येथील घटना अत्यंत गंभीर असून त्यातील आरोपींना फाशी कशी होईल, यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांचा लोकसभेला बारामतीत (Baramati) पराभव झाल्याने ते विधानसभेला या मतदारसंघातून लढणार नाहीत. त्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघ शोधात असून शिरुरमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर अजितदादांनी बारामतीतून ते लढणार की नाही, याचा सस्पेन्स आज त्यांनी आणखीनंच वाढवला.पहिली ही जागा युतीतील तीन पक्षांत कुणाला मिळते हे पहावे लागेल. नंतर बारामतीकरांना हवा तो उमेदवार दिला जाईल, असे सांगत ते तेथून लढणार आहेत की नाहीत याचा संभ्रम आणखी गडद केला.
माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आपली साथ सोडून शरद पवार राष्ट्रवादीत जाणार आहेत, या चर्चेवर बोलताना अजितदादांचा आवाज थोडा चढला. तुम्हाला त्याचं काय देणंघेणं, तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये राहा, तुमंच काम करा, असं त्यांनी सुनावले. नंतर मात्र सूर थोडा खाली घेत ते बोलले. निवडणूक आली की, असे इन्कमिंग, आऊटगोईंग होत असतं. 2014,2019 च्या निवडणुकीत ते घडलं. ते 2024ला ही होत आहे, असे ते म्हणाले. ज्या विद्यमान आमदाराच्या मतदारसंघात दुसरा तयारी करत असतो. त्यातून त्याला वाटते की यावेळी ही जागा सुटेल, असे वाटत नाही, तेच इकडून तिकडे जात असतात. कारण प्रत्येकाला आमदार व्हायचे असते,असे ते म्हणाले.
हरियाणातील निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल, तर लढावे, असे स्टेटमेट दिले आहे. त्यावर एखादी व्यक्ती काही बोलत असेल, तर त्यावर उत्तर देण्याचे मला काय कारण आहे, असा उलट प्रश्न करीत त्यावर बोलणे टाळत वाद होणार नाही, याची खबरदारी अजितदादांनी घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.