

Pune police raid news : महापालिका निवडणुकीचा प्रचार संपलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय रणनीतीकार, सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाईन बॉक्स’ संस्थेच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाड टाकली आहे. पोलिसांकडून कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
नरेश अरोरा यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजितदादांसाठी रणनीती तयार केली होती. त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत डिझाईन बॉक्सचा मोठा वाटा राहिला आहे. अजितदादांचे गुलाबी रंगाचे जॅकेट प्रचारादरम्यान चांगले गाजले होते. निवडणुकीदरम्यान पिंक कॅम्पेनची कल्पनाही चांगलीच चर्चेत आली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीने खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान अजितदादांकडून पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले होते. प्रचार संपण्याच्या काही तास आधीपर्यंत हा कलगीतुरा सुरू होता.
या घडामोडी घडत असतानाच डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावर कारवाई होत असल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी ही कारवाई का केली, नेमकी कोणती कागदपत्रे ताब्यात घेतली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, आज प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राजकारण ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू शकतो, असे संकेत देत थेट भाजपकडे बोट दाखविले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.