
Pune Pagdi for oath-taking ceremony : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालं. यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीचा कार्यक्रम देखील भव्यदिव्य करण्याचं नियोजन करण्यात आले आहे. अनेक अंगानी हा शपथविधीचा सोहळा वैविध्यपूर्ण असणार आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी सर्व महायुतीच्या आमदारांसह शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी विशेष फेटे तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी आजच हे फेटेपुण्याहून मुंबईला रवाना करण्यात येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये(Vidhansabha Election) महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता उद्या सायंकाळी पाच वाजता या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईच्या आझाद मैदान येथे या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री, अनेक केंद्रीयमंत्री उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास केशरी तुकाराम महाराज पगडी बनविण्यात आली आहे.
तर अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खास गुलाबी पगडीची मागणी मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांच्या प्रचारांमध्ये प्रकर्षाने गुलाबी रंग दिसून आला. अजित पवारांनी निवडणुकीचा प्रचार देखील गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करून केल्याचं पाहण्यात आलं यानंतर आता या गुलाबी रंगाच्या पगड्या खास अजित पवारांनी आपल्या आमदारांसाठी मागवल्या असल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादी काँगेसच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्त्याच्या मागणीनुसार या पगड्या तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गिरीश मुरुडकर यांनी दिली आहे.
याबाबत फेटे अन् पगड्या बनवणारे पुण्यातील मुरूडकर झेंडवाले यांनी माहिती देताना सांगितले की, ''उद्या शपथविधी होतोय, त्यासाठी मागील आठवड्यापासूनच आमच्याकडे विविध पगडी अन् फेट्यांची मागणी नोंदवली जात आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, बऱ्याच नेत्यांसाठी त्यांच्या मापाच्या फेटे, पगड्यांची ऑर्डर आलेली आहे. शपथविधी झाल्यानंतरही जे सत्कारसमारंभ होणार आहेत, त्यासाठी देखील अगाऊ नोंदणी झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांसाठी तुकाराम महाराज केशरी पगडी असणार आहे.''
''या पगडीचे वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराज ज्याप्रमाणे पगडी घालायचे, त्याचप्रमाणे ही अखंड कापडात बनवली गेलेली आहे. ही पूर्णपणे देशी पद्धतीने बनवली गेली आहे. म्हणजे यामध्ये पुठ्ठा किंवा अन्य काहीही वापरलेलं नाही. ही पारंपारिक पद्धतीने बांधलेली पगडी आहे. यानंतरच्या कार्यक्रमासाठी फुले पगड्यांची नोंदणी झालेली आहे. याशिवाय उद्याच्या कार्यक्रमासाठी गुलाबी फेट्यांचीही मागणी नोंदवण्यात आली होती.'' असंही मुरूडकर यांनी सांगितलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.