पुणे : पुरंदरमधील त्यावेळचे राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचं दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नव्हते. त्यामुळे कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा दिला. (Ajit Pawar's warning to the opposition)
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, माझी भाषा पहिल्यापासून अशी नाही. तशी भाषा वापरण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केले जाते. पुरंदरमध्ये माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचं दैवत शरद पवार यांच्यावर त्यावेळचे राज्यमंत्री विजय शिवतारे अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते.
अजितदादा म्हणाले की, पवारसाहेबांवर बोलणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. सुप्रिया सुळे याही अनेक वर्षे उत्तम संसदपटू म्हणून काम करत आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ना. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी काही विचार महाराष्ट्राला दिले आहेत ना. महिलांबद्दल वक्तव्य करणे, ती भाषा कुठलाही असावी, याला काही मर्यादा आहेत की नाहीत. काही तारम्य बाळगलं पाहिजे ना.
आम्ही शरद पवार यांच्याकडून शक्य होतील तेवढ्या गोष्टी शिकलो आहोत. निवेदन जागेवर टाकून जाणारेही पुढारी मी बघितले. पण संबंधित माणसाने फार जिव्हाळ्याने ते निवेदन दिलेले असते, त्यामुळे ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. कागद पाहूनच आम्ही काम होणार की नाही, हे सांगतो. काम होत असेल तर त्याला हेलपाटे कशाला मारायला लावता. हल्ली ते लोकांना आवडत आहे, असेही पवार यांनी नमूद केले.
तुमच्याकडे सर्व गोष्टी असतील, तर तुम्ही ठासून बोलू शकता. काहीजण देशाचे पंतप्रधान द्रौपदी मूर्मू असा उल्लेख करतात. लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात. ते काही गोष्टी शिकत जातील. मात्र, तोपर्यंत त्यांचं पद जाईल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.