
Baramati, 09 March : उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या दारात आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहोत, आम्हाला न्याय द्या. बीडमधील भयाण वास्तव, कायदा-सुव्यवस्था आणि ज्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत, त्या अतिशय भयावह आहेत. आम्ही तुमच्या गावात आणि दारात आलोय, आम्हाला तुम्ही न्याय द्या. आमच्याकडे जे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, ती तुम्ही बीडमध्ये आल्यानंतर जाणून घ्या. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. पण, बीडमध्ये झालेल्या चुका कशा सुधरतील आणि आम्हाला न्याय कसा मिळेल, यासाठी आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे कळकळीची विनंती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज (ता. 09 मार्च) बारामतीत सर्वधर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्याय देण्याची विनंती केली.
अजितदादा (Ajit Pawar) तुम्ही, संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा जो घटनाक्रम आहे, तो तुम्ही जाणून घ्या. काही गोष्टींना विलंब होत असल्यामुळे त्यातून होणारे नुकसानीची जबाबदारी कोणाची? या अनुषंगाने तुम्हाला जे काही सांगायचे आहे, जो काही आम्हाला न्याय मागायचा आहे, तो तुम्ही जाणून घ्या, अशी आमची विनंती असणार आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, संतोष देशमुख यांना गमावल्याच्या दुःखाचे गाठोडे घेऊन आम्ही राज्यातील रस्त्यांवर उतरत आहोत. न्याय मागत आहोत, तो मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आरोपी कृष्णा आंधळेला कोणी फरारी केलं, कोणी पोसलंय, याही गोष्टी समोर येतील. त्यालाही लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे.
या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. यातील जे काही आरोपी आहेत, हे कोणाचे आहेत, ते कुठे राहत होते, ते कुठून तुमचा कारभार हाकत होते, हे सर्व समोर आहे, ते तुम्ही एकदा जाणून घ्या आणि गांभीर्याने आमचा विचार करावा, अशी आम्ही अजितदादांना हात जोडून विनंती करतो, अशीही भावना धनंजय यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, ज्या लोकांमुळे बीडमध्ये अराजकता माजली आहे, त्या लोकांना अजितदादांनी एकदा बाजूला करावं, अशी आमची विनंती आहे. चुकीच्या व्यक्तींना तुम्ही बाजूला केलं तर तुमचं काहीही नुकसान होणार नाही. पण तुम्ही चुकीला चूक, अन्यायाला अन्याय आणि न्यायाला न्याय म्हटलं पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.