Amit Shah Vs Sharad Pawar : शरद पवारांना रोखायचे, घरही सावरायचे; भाजपच्या 'चाणक्या'समोर दुहेरी आव्हान

BJP Vs NCP Political News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाजपचे चाणक्य म्हटले जाते. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकण्याच्या त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा शरद पवार आहेत. जागावाटपारून महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्ह आहेत. घर सावरायचे आणि शरद पवारांना रोखायचे, असे दुहेरी आव्हान चाणक्य म्हणजे अमित शाह कसे पेलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Amit shah - Sharad pawar
amit shah sharad pawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजपने शरद पवार यांना हलक्यात घेतले होते. 2014 ची लोकसभा निवडणूक आठवते का? शरद पवार हे माढ्यातून लढणार, अशी चर्चा होती. मात्र शरद पवार काही माढ्यातून लढले नव्हते. शरद पवार यांनी पळ काढला, शरद पवार घाबरले, असा प्रचार भाजपने त्यावेळी केला होता. मोदी लाट सुरू होण्याचा तो काळ होता. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते भरात होते. समाजमाध्यमांवर शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपच्या लोकांनी सोडली नव्हती.

शरद पवार (Sharad Pawar) यांना वाऱ्याची दिशा कळते, त्यामुळे त्यांनी माढ्यातून माघार घेतली, अशी उपहासात्मक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये शरद पवार यांच्यावर केली होती. त्याच्या बरोब्बर दहा वर्षांनंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांची दमछाक केली. दहा वर्षांत चित्र आरपार बदलले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी टाकलेल्या डापवेचांवर भाजपला अजूनही तोड सापडलेला नाही. शरद पवार यांच्यासमोर महाराष्ट्रातील भाजपचे नेते निष्प्रभ दिसू लागले आहेत, हतबल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना रोखणे, हेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लक्ष्य असेल.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. महाराष्ट्र हारलो तर देशपातळीवरील राजकारणावर त्याचे परिणाम होतील, याची जाणीव मोदी आणि शाह यांनी नक्कीच असणार. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.

शिवसेना फोडली, इथवर ठिक होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजितदादा पवार यांना सोबत घेण्याची गरज काय होती, अशा प्रकारच्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजप कार्यकर्त्यांची दमछाक होते आहे. अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी 'मोटिव्हेशनल स्पीकर'सारखी भूमिका पार पाडली. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Amit shah - Sharad pawar
MVA News : मुंबईतील पाच जागांवरुन 'मविआ'च घोडं अडलं; 'या' दोन मतदारसंघावरून काँग्रेस, ठाकरे गटात चुरस

महाराष्ट्रातील दोन प्रादेशिक पक्ष फोडल्याचे भूत भाजपच्या मानगुटीवर विधानसभा निवडणुकीतही बसूनच राहणार आहे. गेली पाच वर्षे महाराष्ट्राने नाना प्रकारच्या राजकीय कुरघोड्या अनुभवल्या. महाविकास आघाडीचे सरकार असाताना आणि महायुतीचे सरकार आल्यानंतरही भाजप या कुरघोड्यांत प्रमुख भूमिकेत राहिला.

शरद पवार संपले, उद्धव ठाकरे संपले, काँग्रेस पक्षही संपला... अशा आविर्भावात राहिलेल्या भाजपला आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्याची जाणीव झालीच नाही. त्यातूनच मग भाजप आणि शिंदे गटातील वाचाळवीरांचा तोरा कायम राहिला. मर्यादा सोडून टीका करण्याचा सिलसिला सुरूच राहिला.

दुसरीकडे, शरद पवार हे शांतपणे काम करत असल्याचे दिसले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांचा वाचाळवीरांच्या यादीत अगदी वरचा क्रम लागतो. एका विशिष्ट समुदायाविषयी ते आग ओकत असतात. देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितेश राणे यांना समज दिल्याचे ऐकिवात नाही.

शरद पवार यांनी काही वाक्यांतच राणे आणि त्यांच्या पुत्रावर केलेली टीका समाजाला विचार करायला लावणारी ठरली. नारायण राणे यांची मुले ज्या पद्धतीने बोलतात, टीका-टिपण्णी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाव न घेता नारायण राणे आणि नितेश राणे यांना सुनावले होते.

Amit shah - Sharad pawar
Arvind Kejriwal News : केजरीवालांच्या अडचणी पुन्हा वाढणार? ; सुकेश चंद्रशेखरच्या तक्रारीवरून 'CBI'ने...

शरद पवार यांनी केलेली ही टीका वाटते तितकी साधी नाही. शरद पवार यांनी राणे पिता-पुत्रांसह भाजपचेही वाभाडे काढले. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला भाजपने गालबोट लावले, असाही त्यांच्या टीकेचा एक अर्थ निघतो. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली. शरद पवार अशा विधानांतूनही विरोधकांची गोची करत असतात.

शरद पवार यांचे हे डावपेच म्हणजे भाजपसाठी अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न ठरू लागले आहेत. त्यामुळे सध्या शरद पवार यांना रोखणे, हेच लक्ष्य अमित शहा यांच्यासमोर आहे. भाजपची प्रचंड मोठी यंत्रणा, मोठे, प्रभावशाली नेते लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या डावपेचांसमोर निष्प्रभ ठरले. त्यामुळे त्यांने रोखण्याचे आव्हान अमित शाह यांच्यासमोर आहे.

महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1350 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले तरी शरद पवार यांच्या शब्दाबाहेर ना काँग्रेस जाणार, ना शिवसेना जाणार अशी परिस्थिती आहे. शरद पवार यांचे बोट धरूनच आपण सत्तेचा सोपान गाठू शकतो, याची जाणीव शिवसेना आणि काँग्रेसलाही झालेली आहे.

महाविकास आघाडीची ही जमेची बाजू आहे. भलेही महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजपला यश मिळाले असेल, मात्र महाविकास आघाडीची मोट बांधून शरद पवार यांनी भाजपला मात देता येते, हा संदेश देशातील विरोधी पक्षांना दिला होता. तो भाजपसाठी मोठा धक्का होता.

Amit shah - Sharad pawar
MVA News : महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; भाकपने मागितल्या 15 जागा

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या डावपेचांचा फटका महायुती आणि भाजपला बसला होता. भाजपने शरद पवार यांचे पुतणे अजितदादांना फोडून आपल्या बाजूने घेतले, मात्र त्यामुळे शरद पवार यांचे नुकसान होणे तर लांबच राहिले, त्यांनी नव्या दमाने उसळी घेतली. विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना रोखणे हे अमित शाह यांचे लक्ष्य असले तरी ते करणार कसे? असा प्रश्न आहे.

पहिल्या टप्प्यात अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपलेच घर सावरताना, म्हणजे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवताना अमित शाह यांच्या नाकीनऊ येणार आहेत. अशा परिस्थितीत ते शरद पवार यांना कसे रोखणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Amit shah - Sharad pawar
Harshvardhan Patil News : नव्या आकाशी, नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी; या गाण्यामुळे इंदापूरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com