इंदापुरात महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) तालुकाध्यक्षांनी माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना पत्र लिहिलं आहे. अशातच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ( Ankita Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वडिलांबाबत एकेरी शब्द वापरले, तर ठाकरे शैलीत उत्तर देणार," असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे.
नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. "तुमच्याजवळ काय होतं? महाले म्हणून एक खरेदी-विक्री संघात अधिकारी होते. त्यांच्या दारात 2 हजारासाठी 2 तास दाराबाहेर हर्षवर्धन पाटलांना बसावं लागलं होतं. अकलूजला मोटारसायकवर जाण्यासाठी सावंतांकडे 3 तास हे दुकानात थांबायचे... आता हे सांगतात मामानं ( दत्तात्रय भरणे ) असं केलं अन् तसं केलं... अहो मामा गाडीत आणि माडीतच जन्मलेले आहेत. तुमच्याजवळ तेव्हा काय होतं? 1970 मध्ये मामाकडे गाडी आणि बंगला होता. तुमच्यासारखे भिXXXXX नव्हते," अशा शब्दांत हनुमंत कोकाटेंनी पाटलांवर ( Hanumant Kokate On Harshvardhan Patil ) टीकास्र डागलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आपली संस्कृती नाही, पण..."
याला अंकिता पाटील यांनीही जशात-तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "वडिलांबाबत ते तालुकाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या आजूबाजूला असणारे लोक असे शब्द उच्चारत असतील, तर त्यांना मी ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपली संस्कृती नाही. पण, त्यांना सांगायचं आहे की पातळी सांभाळून बोला... आम्हीही आमची पातळी सांभाळून बोलत आहे," असं अंकित पाटील म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटलांच्या पत्रात काय?
“महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकिय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून, आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती," असं हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.