माळशिरस (जि. पुणे): जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छूकांची धाकधुक वाढली आहे. पुणे जिल्हा (Pune) परिषदेची संदस्य संख्या ७५ होती. आता त्यामध्ये वाढ होऊन ती ८३ होणार आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात असलेले गट वाढणार असल्याने इच्छूकांची डोकेदुखी वाढली आहे.
मागील पाच वर्षांपासुन पुरंदर तालुक्यात या अगोदर असणारे चार जिल्हा परिषद गट गृहीत धरून निवडणुकीची तयारी अनेकांनी केली आहे. मात्र, तालुक्यात नवीन एक पाचवा गट वाढत असल्याने कार्याकर्त्यांची धाकधुक वाढली आहे. नवीन जिल्हा परिषद गटाचा पूर्वीच्या चार गटावर देखील परिणाम होणार असल्याने कुठली गावे कोणत्या गटात जातील याबाबत तर्क वितर्क करू लागले आहेत. पंचायत समितीच्या गणांवर देखील याचा तेवढाच फरक होणार असल्याने त्या इंच्छुकांची अवस्था देखील तशीच झाली आहे.
सध्या तालुक्यात माळशिरस बेलसर, दिवे गराडे, वीर भिवडी व निरा कोळविहीरे असे चार जिल्हा परिषद गट व त्या प्रत्येक गटात दोन या प्रमाने आठ पंचायत समिती गण आहेत. नवीन एक गट वाढत असल्याने गण देखील दोन वाढून दहा होतील. यामुळे याचा परिणाम सर्वच गटातील व गणातील गावेनिश्चितीवर होणार आहे. यामुळे सहाजिकच पूर्वीचे गट व गण गृहीत धरून गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेली इंच्छुक नेते मंडळी तणावात आली आहेत.
विद्यमान पदाधिकारी आहे तोच आपला मतदारसंघ, त्यातील गावे व मतदार यानुसार तयारी करत असताना या नवीन बदलात आपल्या गट, गणात भौगोलीक रचनेनुसार कोणती गावे जातील व कोणती नव्याने समाविष्टीत होतील याचे अंदाज बांधू लागले आहेत. तर काही इंच्छुकांना पूर्वीच्या रचनेमुळे अवघड वाटणारे गट, गण सोइस्कर होतील अशा आकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत. नवीन बदलामुळे निवडणूक सोपी की अवघड होणार हे गट निश्चितीनंतर ठरणार असल्याने सर्वाच्या नजरा याकडे लागल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाने संभाव्य गट लवकर करून आरक्षण निश्चीत करावे. या मुळे सर्व पक्षातील कार्यकर्ते, नेते मंडळींना आवश्यक निवडणूक तयारी साठी वेळ मिळेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व वाघापूरचे उपसरपंच सौरभ कुंजीर म्हणाले.
नव्याने गट रचना करताना भौगोलिकदृष्ट्या सोईस्कर होव्यात, मतदार व लोकप्रतिनिधींच्यात कायम संपर्क राहण्यासाठी दळणवळणाच्या मार्गावरील गावे गट व गणात राहतील याची काळजी नवीन रचना करताना घेतली जावी, असे काँग्रेसचे नेते व माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके म्हणाले. कार्यकर्ते व इंच्छुकांना वेळ मिळण्याकरिता लवकर गट निश्चीत करावी, अशी मागणी शिवसेना युवा समन्वयक गणेश मुळीक यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.