
Ashadhi Wari 2025 News Update : ''वारीत नक्षलवादाचे आरोप असलेले लोक सहभागी होत असून ते वारकऱ्यांमध्ये बुद्धिभेद करत आहेत.'', असा आरोप ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. तसेच, अशा व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या बुद्धिभेदाला रोखण्यासाठी ‘वारकरी युवक गट’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहितीही कराडकर यांनी दिली.
समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्या वतीने शनिवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत कराडकर बोलत होते. कराडकर यांनी कबीर कला मंचला वारीत प्रवेशास बंदी घालावी अशी देखील मागणी केली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती वारीत नक्की काय करते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काही पुरोगामी संघटना पालखी सोहळ्यात येऊन संतांचे अर्धवट दाखले देत वारकरी संप्रदायाची बदनामी करत असल्याचे बंडातात्या कराडकर म्हणाले. तसेच, वारी ही व्यक्तीला आत्म्याकडून परत्म्याकडे नेणारी आध्यात्मिक यात्रा आहे. अशा पवित्र धार्मिक यात्रेत जे देव-धर्म मानत नाही, पूजा करत नाही, देव-धर्मावर टीका करतात, तसेच "संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, हे धादांत खोटे आहे...", "संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे चुकीचे आहे...', 'संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे खोटे आहे...', असा आयुष्यभर दुष्प्रचार करणारे अंधश्रद्धा निर्मूलनवाले, कबीर कला मंच, नास्तिकतावादी संघटना आणि अन्य शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी पंढरीच्या वारीत 'समता दिंडी-पर्यावरण दिंडी' आदी गोंडस नावाने उघडपणे शिरकाव केला आहे. असा आरोपही कराडकर यांनी केला आहे.
याचबरोबर 'हे लोक संतांचे अर्धवट व सोयीस्कर दाखले देऊन बुद्धीभेद करत आहेत. स्वतःचा छुपा अजेंडा पंढरीच्या वारीत राबवत आहेत. मुळात वारकरी हा कोणताही जाती, उच्चनीच वा भेदाभेद मानणारा नाही. तो सर्वांना सामावून घेणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये समानता वा समता यांचा प्रचार करण्याची आवश्यकता नाही. पंढरीची वारी ही पूर्णपणे धार्मिक व श्रद्धेची वारी असल्याने अशांना शासनाने तत्काळ रोखले पाहिजे. तसेच या वारी मार्गांवर मागील वर्षी ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून धर्मांतरासाठी पुस्तके वाटणे, येशूचा प्रचार करण्याचे प्रकार घडले होते. हे सर्व थांबले पाहिजे. लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा सर्व लोकांवर शासनाने कारवाई केली पाहिजे.' अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
याशिवाय, मोशीतील प्रस्तावित कत्तलखान्यावर बोलताना कराडकर म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणालेत की कत्तलखाना होणार नाही, पण त्याची लेखी हमी हवी. आम्ही पंढरपूरला पोहोचेपर्यंत सरकारने आमच्या मागण्या लेखी मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडले जाईल." तसेच, वारकरी संप्रदाय हा देशातील सर्वात मोठा भक्तिपंथ असून, त्यांच्या श्रद्धेवर कुणीही घाला घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याला संघशक्तीने उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.