
Pune News : आयटी हब हिंजवडीत रविवारी दुपारच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर तडीपार गुंडांनी बेदम मारहाण केली आहे.
भाडे वसुलीसाठी गेलेल्या अजिंक्यवर पिझ्झा कटर, काटे-चमचे आणि सिमेंट ब्लॉक्सने केलेल्या हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यला तात्काळ रुग्णालयात नेले गेले. या घटनेनंतर पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘बेलबॉटम’ हॉटेलमध्ये भडकला वाद, गुंडांनी उगारले हत्यारे
हिंजवडीतील जुन्या जकात नाका परिसरातील ‘बेलबॉटम’ हॉटेलमध्ये अजिंक्य भाडेकरूंवर दबाव टाकण्यासाठी गेला. पण भाडेकरू आणि अजिंक्य यांच्यात बाचाबाची झाली आणि क्षणात वातावरण ढवळून निघाले. संतापलेल्या गुंडांनी पिझ्झा कटरने अजिंक्यचे कपडे चिरडले, चमचा डोक्यावर मारला आणि सिमेंट ब्लॉकने छातीवर घाव केले.
हल्लेखोर आहेत तडीपार
या हल्ल्यातील गुंड म्हणजे सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, बंटी ठाकरे आणि समाधान यांनी हे कृत्य केले. या गुंडांवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तडीपार आणि फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेनंतर हिंजवडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी पोलिसांनी झटपट कारवाई करत काही आरोपींना अटक केली, तर उर्वरित फरार गुंडांचा माग काढण्यासाठी सापळे रचले आहेत.
प्रकरणात कलम 109 (हत्या करण्याचा प्रयत्न), 189 (गुन्हेगारी शस्त्राचा वापर),191 (गुन्हेगारी जमाव) आणि इतर भारी कलमे दाखल करण्यात आले आहेत. हल्ल्यामागे वैयक्तिक शत्रुत्व की आर्थिक फसवणूक, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, अजिंक्य विनोदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे पुत्र असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. हिंजवडीसारख्या आयटी हब मध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.