Maval Political News : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. ज्याचा आमदार त्याचा उमेदवार या सूत्रानुसार मावळातून अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दावा केला आहे.
मात्र भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी महायुतीकडून सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर प्रचार करणार नाही, असे भरसभेत जाहीर केले. त्यामुळे मावळात महायुतीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यभर महायुतीत जागा वाटपावरुन वाद सुरू झाले आहेत. मावळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच सुरू आहे. आगामी विधानसभेत मावळातून आपलाच उमेदवार असेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
या धर्तीवर वडगाव मावळ येथील विजयी संकल्प मेळाव्यात भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा ठरावही मंजूर केल्याने महायुतीत संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे.
मावळात महायुतीतील अजित पवार गटाचे सुनील शेळके Sunil Shelke आमदार आहेत. त्यामुळे या जागेवर आता महायुतीचे उमेदवार शेळकेच असतील, असा सूर राष्ट्रवादीचा आहे. मात्र मावळची जागा भाजपला मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले आहे. तर भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करत तेच विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित केले आहे.
महायुतीत आमदार शेळकेंना उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपमधील इच्छुकांबाबत शेळके म्हणाले, मावळ विधानसभेवर भाजप दावा करत असेल, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या प्रचाराबाबत कोणी शंका घेत असेल तर हे योग्य नाही.
भाजपच्या मेळाव्यातूनच मावळात, राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर प्रचार करणार नाही, असा ठराव भाजच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच माजी आमदार बाळा भेगडे Bala Bhegde यांनीही तोच पवित्रा घेतल्याने शेळकेंच्या अडचणीत भर पडली आहे. महायुतीतील या दुहीमुळे मावळातून विधानसभा निवडणूक कोण लढवणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.