
भाजपचे “ऑपरेशन लोटस” – पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला कमकुवत करण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात नेते-कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेतल्याची चर्चा आहे.
मावळवर मोर्चा – मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांना लक्ष्य करून भाजपने बापू भेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणण्याचा डाव आखला आहे.
राजकीय परिणाम – बापू भेगडे यांचा प्रवेश आणि त्यांचे मजबूत संघटन यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या गडात भाजपला बळ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
Pune, 15 Semptember : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून पुणे जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस राबविण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार तिथे भाजप तगड्या नेत्याला पायघड्या घालत असल्याचं चित्र सध्या पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अजितदादांचे होमपिच असलेल्या पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यातच अजितदादांच्या लाडक्या आमदाराला चॅलेंज देणाऱ्या बड्या नेत्याचाही भाजप प्रवेश होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय हालचाली पाहिल्या, तर भाजप (bjp) आपली ताकद वाढवत असल्याचे दिसून येत आहे. भाजपने यापूर्वी भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्षात घेतलं. त्यानंतर पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगतापही भाजपवासी झाले. त्यापूर्वी इंदापूरमधून प्रवीण माने यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला होता.
भोर, पुरंदर आणि इंदापूरनंतर भाजपने आपला मोर्चा मावळ तालुक्याकडे वळविला आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार सुनील शेळके आमदार असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप एका बड्या नेत्याचा पक्षप्रवेश करून घेत आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची होम ग्राउंड असणाऱ्या पुणे जिल्ह्यातच कोंडी करण्याचा भाजपचा डाव असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे आमदार आहेत. याच ठिकाणी भाजपने आपला डाव टाकला असून नेते आणि कार्यकर्ते गळाला लावले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मावळ पॅटर्नची मोठी चर्चा झाली होती. आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीला विरोध करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे यांनी बंडखोरी केली होती. भेगडे यांनी सुनील शेळके यांच्या विरोधात मावळमधून निवडणूक लढवली होती. मात्र, बापू भेगडे यांच्या बंडखोरीमागे भाजपचा डाव असल्याची टीका त्यावेळी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच तेच बापू भेगडे भाजपच्या गळाला लागले आहेत.
बापू भेगडे यांचा आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या या प्रवेशासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. बाळा भेगडे आणि सुनील शेळके हे मावळमधील कट्टर राजकीय विरोधक आहेत. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन भाजप आमदार बाळा भेगडे यांचा पराभव करून मोठा विजय मिळविला होता. तेव्हापासून या दोघांमध्ये कट्टर राजकीय वैर पाहायला मिळत आहे.
सुनील शेळके यांना अडचणीत आणण्यासाठी बाळा भेगडे यांनी मोठा डाव टाकला असून राष्ट्रवादीला मावळात धक्का देण्याची तयारी त्यांनी केली आहे. महायुतीविरोधात काम केल्यामुळे बापू भेगडे यांना आधीच पक्षातून निलंबित करण्यात आले होते, तेच भेगडे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव वायकर आणि शेकडो कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जय श्रीराम म्हणणार आहेत.
बापू भेगडेंच्या भाजप प्रवेशामुळे मावळमधील भाजपची ताकद वाढणार आहे. भेगडे यांचे मावळमध्ये मजबूत संघटन आहे, तसेच संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठी भाजपने केलेली ही रणनीती मावळच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भाजपचे ऑपरेशन लोटस कुठे सुरू असल्याची चर्चा आहे?
उ. – पुणे जिल्ह्यात, विशेषतः मावळ मतदारसंघात.
प्र.2: मावळमधील राष्ट्रवादी आमदार कोण आहेत?
उ. – सुनील शेळके.
प्र.3: भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख नेते कोण आहेत?
उ. – राष्ट्रवादीचे बापू भेगडे, त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते.
प्र.4: बापू भेगडेंच्या प्रवेशाचा भाजपला काय फायदा होईल?
उ. – त्यांच्या संघटनशक्तीमुळे मावळ आणि पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.