

Baramati News : बारामती नगर परिषद निवडणुकीत 'राष्ट्रवादी' विरुद्ध 'राष्ट्रवादी' असा सामना होत आहे. सुरुवातीपासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र होते. पण अर्ज माघारी घेण्याची मुदत संपता संपता युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही मोठे आव्हान उभे केले. अशात जानकरांच्या 'राष्ट्रीय समाज पक्षाने' भाजपला साथ दिल्याने या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.
बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बळीराम बेलदार, तर भाजपकडून गोविंद देवकाते आणि बहुजन समाज पक्षाकडून काळुराम चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती नगर परिषदेतील एकूण 41 पैकी भाजपने 32 उमेदवार रिंगणात उतरवून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान उभे केले आहे.
दोन्ही 'राष्ट्रवादी'ने निवडणूक एकत्र लढवायची की स्वबळावर, याचा सर्वस्वी निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा अशी भूमिका शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काका-पुतणे एकत्र लढणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतु दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवत एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून बारामती नगरपालिकेमध्ये अजितदादांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यापूर्वी शरद पवार यांच्याकडे पालिकेची सर्व सुत्रे होती, त्यांच्या मार्गदर्शखाली सर्व निर्णय होत असत. गेल्या निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरुद्ध अन्य पक्ष असा सामना रंगला होता. त्यावेळी 39 जागांपैकी 35 जागा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत 2 जागा वाढल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'राष्ट्रवादी'चे 8 नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामधील 4 उमेदवारांना खरेदी केल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केल्याने बारामतीतील राजकीय वातावरणाचा पारा चढला आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याचा अंदाज बांधत महायुतीतील मित्रपक्ष भाजपने (BJP) राष्ट्रीय समाज पक्षाच्या साथीने उमेदवार उभे करून निवडणुकीत रंगत आणली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.