पिंपरी : आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्या वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वच सरकारी कार्यालयांचा आटापिटा सुरु होतो. पिंपरी-चिंचवड महापालिकाही त्याला अपवाद नाही. मात्र, यावेळी नवीन आर्थिक वर्षात (२०२३-२४) महापालिकेला वेळीच शहाणपण सुचले आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटी थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिका जप्त करणार नसून ही कारवाई वर्षाच्या सुरवातीपासून आता महापालिका करणार आहे.
31 मार्च 2023 अखेर पिंपरी-चिंचवड शहरातील 50 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता पालिकेच्या रडारवर आहेत. त्यातील 39 हजार 655 मालमत्ताधारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे. तो वसुलीसाठी सुरुवातीस एसएमएस, कॉलिंगद्वारे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतरही तो न भरल्यास पंधरा दिवसांत जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेने आज दिला आहे.
दरम्यान, गतवर्षी जप्त केलेल्या थकबाकीदारांच्या शंभर मालमत्तांचा दोन महिन्यात लिलावही करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्यात निवासी, बिगर निवासी तसेच औद्योगिक मालमत्ता आहेत. मिळकतकर हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आणि मोठा स्त्रोत आहे. गतवर्षी साडेतीनशे कोटी थकीत असलेला कर वसूल करण्यात आला होता.
यावर्षी (2023-24) 1 हजार कोटींचे करवसुलीचे टार्गेट पालिकेने ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी जुना थकीत कर जास्तीत जास्त प्रमाणात कसा वसूल होईल, यासाठी प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत.
1 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या 22 हजार मालमत्ता धारकांना 2023-24 या आर्थिक वर्षाच्या कराच्या बिलावाबरोबरच जप्ती पूर्व नोटीसा बजावल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे 647 कोटी 62 लाख 40 हजार रुपयांचा कर थकीत आहे. पहिल्या तीन महिन्यात 30 जून अखेर 400 कोटी रुपयांचा कर जमा करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.