मंचर (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक डिंभे मतदार संघातून सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्व १५ उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीने (NCP) उमेदवारी नाकारल्याने मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली होती. मात्र, पहिल्या फेरीत निकम यांना पडलेली मते पाहता ते मोठ्या पिछाडीवर पडलेले दिसत आहेत. (Big lead of 15 candidates of Mahavikas Aghadi in Manchar)
बाजार समितीच्या घोडेगाव, मंचर, निरगुडसर येथील मतदान केंद्रातील मतमोजणी होणे बाकी आहे. बाजार समितीचा संपूर्ण निकाल दुपारी दोनपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. उमेदवारी नाकारल्याने निकम यांनी थेट राष्ट्रवादीला म्हणजे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना आव्हान दिल्याचे मानले जात होते. मात्र, त्यात ते पहिल्याच फेरीत पिछाडीवर पडले आहेत.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस पक्ष यांची महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे गेली होती. या महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते देवदत्त निकम अशी येथे तिरंगी लढत होत आहे.
डिंभे मतदार संघात सोसायटीसाठी ८८ मतदार होते. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सरासरी ५७ ते ६३ मतदान झाले आहे. देवदत्त निकम यांना २१ मते मिळाली आहेत. ग्रामपंचायत गटात महाविकास आघाडीला सरासरी १५० मते मिळाली आहेत, तर विरोधी उमेदवार भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांना ४६ मते मिळाली आहेत.
घोडेगाव, मंचर, पारगाव येथील मतदान केंद्रातील निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर होईल. पी. एस. रोकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता दुपारी दोन वाजता निवडणुकीचा संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.